सोलापूर, दि.12: मोहोळ तालुक्यात भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण आणि बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्यासाठी तालुक्यात अटल भूजल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख यांनी केली आहे.
गुरूवारी मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये आयोजित ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या कार्यशाळेत शेख बोलत होते. गटविकास अधिकारी गणेश मोरे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, सहाय्यक भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर, विस्तार अधिकारी नागेश बागवाले, विजय जाधव, डी.बी. चंदनशिवे, जी.के.आडम, श्रीक्षैल बबलेश्वर, रवी गोलेकर आदी उपस्थित होते.
शेख म्हणाले, जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत अटल योजनेसंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. ग्रामस्तरावर जलसुरक्षा आराखडा तयार करणे, पाणी पातळीसाठी निरीक्षण विहीर, पिझोमिटर बसविणेसाठी जागा निश्चित करणे आदीचे नियोजन करावे.
मोरे म्हणाले, ग्रामपंचायत स्तरावर योजना राबविण्यासाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांनी समन्वयाने काम करावे. कार्यशाळेमध्ये कृषी विभागाशी निगडित माहिती प्रपत्रामध्ये कशी भरावी, याविषयी सूर्यकांत मोरे यांनी मार्गदर्शन केले.