सोलापूर,दि.11- कोरोना महामारीमुळे जगाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ही महामारी लवकर आटोक्यात न आल्यास संपूर्ण जगाचा विकासदर खूप खालावण्याची शक्यता आहे. याचे दूरगामी परिणाम जगाला भोगावे लागतील, अशी भिती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केली.
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व बँक ऑफ महाराष्ट्र इम्प्लाॅयीज युनियन औरंगाबादतर्फे आयोजित कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमालेत डॉ. देवळाणकर हे बोलत होते. व्याख्यानमालेचे नववे वर्ष आहे. “कोरोनानंतरच्या विश्वात भारताचे स्थान” असा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव व्ही.बी. घुटे, बँक ऑफ महाराष्ट्र इम्प्लाॅयीज युनियन औरंगाबादचे धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. झूम अॅप व युट्युबवरून हा कार्यक्रम झाला.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस.एस. सूर्यवंशी यांनी केले.
डॉ. देवळाणकर म्हणाले की, कोरोनाचा उगम हा नैसर्गिक नसावा, तो मानवनिर्मित असावा अशी शक्यता जगातील अनेक शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. जे देश प्रगत आहेत, ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे ते देश ही महामारी रोखण्यात, मृत्युदर रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. युरोप, अमेरिकासारख्या देशांनी लसीचा मोठा साठा केला आहे. असे असूनही तेथील लोक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. याउलट परिस्थिती अप्रगत देशात आहेत. आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकन देशामध्ये फ्रंटलाईन वर्करनाही लस मिळत नाही. आरोग्य सुविधांबाबत जगात अशी मोठी विषमता दिसून येत आहे. जगातील उदारमतवाद संपू लागल्याचे या काळात दिसत आहे. अमेरिकेची याबाबतची भूमिका आत्मकेंद्री राहिली आहे. आंतरराष्ट्रीय संघटना या काळात तात्काळ सक्रीय झाल्या नाही तर जगात आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. कोरोना ही जागतिक समस्या असल्याने त्यासाठी जागतिक पातळीवर एकोप्याने, मदतीच्या भावनेने प्रयत्न व्हायला हवेत.
कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, कोरोनाने जगाला खूप काही शिकवले आहे. संपूर्ण जगच या महामारीने बाधित झाले आहे. कोरोनानंतरच्या काळातही आपल्याला आरोग्याबाबत खूप चांगल्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात गुंतवणूक व मोठे काम करावे लागणार आहे. मेडिकल टुरिझमलाही वाव असणार आहे. देशवासियांना स्वत:च्या तब्येतीसाठी स्वयंशिस्तही पुढल्या काळात कायम ठेवावी लागणार आहे. कोरोनानंतरच्या काळात लघु उद्योगांना बळ दिल्यास अर्थचक्र पूर्वपदावर येईल. विकासाची दिशा देशाने निश्चित केल्यास देशवासियानीही त्यात सर्व मतभेद विसरून सामील झाले पाहिजे. मेडिकल किंवा इतर बाबतीत देशाला स्वावलंबी व्हावे लागेल. शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचाही दृष्टीकोन सर्वाना बदलावा लागेल. कौशल्ययुक्त शिक्षणातून पुढील काळात चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले तर आभार डॉ. ज्योती माशाळे यांनी मानले. अधिष्ठाता डॉ. व्ही. एल. कदम यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी ऑनलाइनरित्या उपस्थित होते.