मुंबई : पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्ह आणि केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध थेट अॅक्शन घेण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी हुतात्मा चौकातच येऊन आंदोलन केले. यावेळी, राज्य आणि केंद्र सरकारला उद्देशून त्यांनी काही सूचना केल्या आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागी मी असतो तर पुतिन यांची नीती वापरली असती. युक्रेन जर नाटोकडे गेला तर रशियाला धोका असल्याची मानसिकता त्यांची आहे, त्यामुळे त्यांनी युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चर उध्वस्त केलं आहे. त्यांचा हेतू हाच आहे की वाढ थांबेल पण युद्ध थांबल्यानंतर युक्रेन पुन्हा नाटोकडे गेला तर धोका कायम आहे. आपल्याला पण अशीच काही नीती वापरली पाहिजे की पाकिस्तान पुढच्या 30 वर्षात मागे जाईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. प्रकाश आंबेडकरांनी रशिया-युक्रेन युद्धाचा संदर्भत देत काही सूचना केल्या आहेत.
रशियाने युक्रेन संदर्भात जी स्ट्रॅटीजी वापरली तीच मी वापरली असती. रशियाने गेल्या 2 वर्षात युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चर डिस्ट्रॉय केलं आहे. उद्या ज्यावेळी युद्ध थांबेल तेव्हा युक्रेन नाटोकडे गेले तरी त्याचा धोका राहणार नाही. म्हणून रशिया त्यांचे इन्फ्रास्ट्रकचर नष्ट करत आहेत, मी देखील हेच केलं असतं, असे प्रकाश आंबेडकर यांनी युद्धनीतीवर बोलताना म्हटले.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, पहलगाम हल्ल्यासंदर्भात आजच सकाळी अधिकृत बातमी आहे की पाकिस्तान आर्मीचा यात सहभाग आहे. आपली मिलिट्री अॅक्शन घ्यायला तयार आहे. पण, सरकारमध्ये असणारी पॉलिटिकल लीडरशिप कुठेतरी कच खात आहे. एकदा युद्ध करायचं ठरवलं की त्याचा परिणाम जनता सहन करायला तयार आहे. जनतेची पण मागणी आहे, प्रत्येकवेळी काही ना काही कारणाने आपण माघार घेतो. मात्र, यावेळी अॅक्शन झालीच पाहिजे, सर्वपक्षाचा, जनतेचा पाठिंबा सरकारला आहे. त्यामुळे, रिअॅक्शनची परवा न करता ॲक्शन घ्या अशी लोकांची भावना असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
आपले इंटेलिजन्स फेल्युअर, हल्लेखोर कुठं?
आपले इंटेलिजन्स फेल्युअर आहे, याबाबत दुमत नाही. अजून याना हल्लेखोर सापडले नाहीत, ते कुठून आले हे देखील आपल्याला समजलेले नाही. मला असं वाटतं हल्लेखोर लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून गेले आहेत. आता मिलिट्री आदेश द्यावेत आणि कारवाई करावी. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ठोस कारवाई करतील अशी अपेक्षा करत आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
मिलिट्रीला डायरेक्ट आदेश द्यावेत
शासनाने कृती आणि व्यवहारात ही गोष्ट आणली पाहिजे, मी जर माझ्या शब्दात म्हणायचं झालं तर एडवांटेज इंडिया अशी परिस्थिती आहे. राजकीय विल, लढण्यासाठी जी हिम्मत लागते ती देखील सरकारच्या लीडरशिपने आणावी.मिलिट्रीला डायरेक्ट आदेश द्यायला हवे, अशी मागणी आंबेडकर यांनी मोदी सरकारकडे केली आहे. एवढी मोठी आर्मी असूनही आपण अपमानित आहोत, यापेक्षा आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो. शासन कच खात असल्याचे आम्हाला जाणवले म्हणूनच हुतात्मा चौकातच येऊन आम्ही आंदोलनाला बसलो आहेत. वेळ पडली, जर तिजोरी कमी पडणार असेल तर जनता ही स्वतः तिजोरी भरायला देखील तयार आहे, हा संदेश देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.