येस न्युज मराठी नेटवर्क : आएएस (IAS) अधिकारी पूजा सिंघल यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने शुक्रवारी सकाळी देशाच्या विविध भागात एकाच वेळी 20 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.
एकाचवेळी अनेक ठिकाणी छापेमारी
मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पथकांनी सकाळी सहा वाजल्यापासून छापे टाकण्यास सुरुवात केली. नवी दिल्ली, मुंबई, जयपूर, फरीदाबाद, गुरुग्राम, मुझफ्फरपूर, रांची आणि इतर शहरांमध्ये हे छापे टाकण्यात आले. पूजा सिंघलचा दुसरा पती अभिषेकच्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह सहा ठिकाणी झडती घेण्यात आली. पूजाचा पहिला नवरा झारखंडमधील 1999 बॅचचा आयएएस अधिकारी आहे.
25 करोडची रोकड जप्त
ईडीने पूजा सिंघल यांच्या चार्टर्ड अकाऊंटंटच्या रांचीतल्या कार्यालयतून 25 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता राम विनोद प्रसाद सिन्हा यांच्या चौकशीनंतर हे छापे टाकण्यात आले. सिन्हा सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात आहेत. पूजा सिंघल यांनी वेलफेअर पॉइंट आणि प्रेरणा निकेतन या दोन स्वयंसेवी संस्थांना 6 कोटी रुपयांच्या निधीसाठी भाग पाडलं होतं असा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय पूजा सिंघल यांच्यावर चतरा, पलामू, खुंटी जिल्ह्यांमध्ये उपायुक्त असताना मनरेगामध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे.