येस न्युज मराठी नेटवर्क । ईडीच्या माध्यमातून भाजपा विरोधकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी माथाडी कामगार तसंच व्यापाऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले की, “नोटीस भाजपाच्या लोकांना नाही तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. भाजपाच्या विरोधकांना नोटीस आल्या आहेत त्याच्यावरुनच समजून घ्या की ईडीचा वापर कशा पद्धतीने होत आहे. उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल.” “सर्वसामान्यांना सुद्ध आता ईडीसारखी संस्था गेल्या पाच वर्षात फक्त राजकीय हेतूने वापरली जात असल्याचं लक्षात आलं आहे. इतकी मोठी संस्था फक्त राजकीय दृष्टीकोनातून वापरली जात जात आहे. त्यात काही निष्पन्न होत नाही,” असं रोहित पवार यांनी सांगितलं.