राज्यातील राजकीय वातावरण सध्या जोरदार तापलेले आहे. निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जनसभांमध्ये एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये घेतलेल्या सभेत मोठे विधान केले. अंबाजोगाई येथील सभेत जीभ घसरल्याने झालेल्या वादावर त्यांनी अखेर सार्वजनिक प्रतिक्रिया देत माफी मागितली. सभेत बोलताना एखादा शब्द चुकीचा निघू शकतो, पण त्या शब्दाने लोकांची भावना दुखावली असेल तर त्याबद्दल क्षमा मागणे माझे कर्तव्य आहे, असे म्हणत अजित पवारांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
अजित पवारांनी स्पष्ट केले की, अंबाजोगाई येथे मी जे बोललो ते शहरातील अस्वच्छतेविरोधात होते. मात्र, वापरलेला शब्द योग्य नव्हता, हे मला जाणवले. माध्यमांनी त्या शब्दाचा मुद्दा मोठा केला, पण ती चूक माझीच होती, अशी कबुलीही त्यांनी दिली. मी चुकीचा शब्द वापरला, भिकारपणा. तो शब्द माझ्याकडून निघायला नको होता. त्याबद्दल मी जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत त्यांनी आत्मपरीक्षण केल्याची कबुली दिली. त्यांच्या या कबुलीमुळे सभेत उपस्थित लोकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.
मला टीआरपीमध्ये नव्हे, तर जनतेच्या विकासात रस
सभेमध्ये अजित पवारांनी आपल्या काम करण्याच्या शैलीवरही भाष्य केले. लोक म्हणतात मी कडक बोलतो. पण मी कडक नाही, कामसू आहे. सकाळी सहा वाजता मी कामात झोकून देतो. कामाचा माणूस असल्यामुळेच जनता मला पुन्हा पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून देते, असे म्हणत त्यांनी स्वतःची कार्यशैलीही ठळकपणे मांडली. विरोधक टीव्हीवर काय दाखवतात यावर लक्ष देतात; पण मला टीआरपीमध्ये नव्हे, तर जनतेच्या विकासात रस आहे, असा स्पष्ट टोला त्यांनी लगावला. कामगिरी हीच माझी भाषा आणि त्यावरच जनतेचा विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जनतेच्या पैशात डल्ला मारून राजकारण करणाऱ्यांना आम्ही उघडे पाडू
यानंतर अजित पवारांनी भ्रष्टाचार आणि गुत्तेदारी यावर घणाघाती विधान केले. राजकारण करायचे तर पारदर्शकपणे करा. आणि गुत्तेदारी करायची असेल तर राजकारणात पाऊल टाकू नका, अशी चेतावणी त्यांनी दिली. नगराध्यक्ष पदावर असलेल्यांच्या घरातील व्यक्तीच ठेके घेत असल्याची प्रथा वाढली आहे, त्यामुळे विकासकामांचा दर्जा खाली येतो आणि नागरिकांची फसवणूक होते, अशी टीका त्यांनी नाव न घेता अनेकांवर केली. जनतेच्या पैशात डल्ला मारून राजकारण करणाऱ्यांना आम्ही उघडे पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.
आपली प्रतिमा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न
अकोटमधील सभेत अजित पवारांना मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा आणि सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजकीय व्यासपीठावर विरोधक हल्ले चढवत असताना, पवार यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने आपली प्रतिमा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे टीका, तर दुसरीकडे विकासाचे दावे असा समतोल राखत ते सार्वजनिक विश्वास टिकवण्याचा प्रयत्न करताना दिसले. आगामी नगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेची कोणावर मोहर लागणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

