येस न्युज मराठी नेटवर्क : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुपारी 12.15 च्या सुमारास दोघांची भेट झाली. संभाजीराजे हे मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली. यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजता ही भेट नियोजित आहे. त्यानंतर संभाजीराजे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
“मी देवेंद्रजींना सांगितलं की, मराठा समाजातील गरिबांची वाईट परिस्थिती आहे. समाज अस्वस्थ आहे. या समाजाला न्याय मिळवून दिला नाही तर आपण सर्वजण जबाबदार असू. आपण या समाजाला न्याय देण्यासाठी राजकारणापलिकडे पाहायला हवं. त्यासाठी मुख्यमंत्री – विरोधी पक्ष नेते यांनी सर्वांनी एकत्र यायला हवं. मी हात जोडून सांगितलं, विनम्रपणे सांगितलं माझं तुझं करण्यापेक्षा आपण एकत्र येऊ. आता आपण एकत्र आलो नाही आणि समाजाला न्याय दिला नाही तर जे काही समाजाचं होईल, त्यासाठी माझ्यासह तुम्ही-आम्ही सर्व आमदार खासदार सर्व जबाबदार असतील”, असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.