मुंबई – मला मंत्री व्हायचंय म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात, स्वप्नातही येणे शक्य नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी वारंवार केली जातेय पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोललेत. बीड प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार आणि त्यात जे कुणी दोषी सापडतील, मग कुणीही असतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. पण या अगोदरच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला जातोय असा सवाल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
मुंबईतील पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले की, बीडच्या चौकशीत काही बाहेर आलंय का? कुणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी ते चौकशी करतील. मात्र जोपर्यंत या प्रकरणात त्यांचा हात आहे हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा का द्यावा आणि मागावा. मला हे योग्य वाटत नाहीत. अशा एका प्रकरणातून मीही गेलोय. २००३ मध्ये तेलगी प्रकरणात त्याला मी पकडले, मोक्का लावला आणि सगळं काही मी केल्यानंतर माझ्यावर आरोप लावण्यात आला. तेव्हा मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही होतो माझा राजीनामा घेण्यात आला. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतानाच मीच सुप्रीम कोर्टात गेलो आणि ती केस सीबीआय दिली. त्यावेळी भाजपा सरकार होते. सीबीआयने त्या खटल्याची पूर्ण चौकशी केली त्यानंतर मी केलेली कारवाई योग्य आहे. तुमचा काहीही दोष नाही असं रिपोर्टमध्ये आले. माझे नावही चार्जशीटमध्ये आले नाही. तरीही उपमुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद गेले, कारण नसताना मनस्ताप झाला. मी हे सगळे भोगले आहे. पुरावा नसताना राजीनामा घेतला गेला. चौकशीत काही सापडले तर तो भाग वेगळा असतो असं त्यांनी सांगितले.