महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज सोमवार ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या परीक्षेत बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने मोठे यश मिळवले आहे. वैभवीला बारावीच्या परीक्षेत ८५.११ टक्के गुणे मिळाले आहेत. वैभवीने निकालापूर्वी भावूक प्रतिक्रिया दिली होती. आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी नाहीत, याचे मला दुःख आहे, असे वैभवी देशमुखने म्हटले होते.
वैभवी देशमुखची बारावीची गुणपत्रिका समोर आली आहे. यात वैभवीला ६०० पैकी एकूण ५१२ गुण मिळवले आहेत. तिला इंग्रजी विषयात ६३, मराठीत ८३, गणितात ९४, फिजिक्समध्ये ८३, केमिस्ट्रीमध्ये ९१ आणि बायोलॉजीमध्ये सर्वाधिक ९८ गुण मिळाले आहेत. विशेष बाब म्हणजे, वैभवी देशमुखने तिच्या वडिलांच्या हत्येनंतर अवघ्या दोन महिन्यांनी तिने दुःखाचा डोंगर असतानाही बारावीची परीक्षा दिली होती. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपण परीक्षा देत असल्याचे तिने त्यावेळी सांगितले होते.
वैभवी देशमुख निकालापूर्वी काय म्हणाली?
आज बारावीच्या निकालापूर्वी वैभवी म्हणाली, “आज सकाळी मी वडिलांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यांच्या पश्चात मी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगला येईल, असा मला विश्वास आहे. पण आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत, याचे मला दुःख आहे,” अशी भावना तिने व्यक्त केली होती.