सोलापूर : पाश्चिमात्य संस्कृतीच्या पगड्यामुळे माणसाचं जगणं हे कृतीमरीत्या होत चालल आहे . त्यामध्ये आपल्या संस्कृतीतील नैसर्गिकपणा हरवत चालला आहे. म्हणून माणसाच्या जगण्यामध्ये नैसर्गिकता असावी कृत्रिमता नसावी असे मत सोलापूरचे माजी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी व्यक्त केले. आजच्या विश्वात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास’ या विषयावर अरविंदभाई झवेरी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. सेनगावकर यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी घेतली होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासासाठी गर्भसंस्कार महत्वाचे आहेत. जन्माला आलेल मूल शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असले पाहिजे. यामुळे अनुकूल परिणाम होतात. प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ येतोच. अशावेळी ही सुदृढ मुले त्याला यशस्वीपणे सामोरे जातात. मुलांमधील खिलाडूपणा वाढला पाहिजे. भारतातील मुले सध्या रेसमध्ये लागली असून जीवन जगणे त्यांना माहीतच नाही. भारतीय संस्कृतीमधील ज्येष्ठांचे महत्व ओळखून त्यांचा सहवास मुलांना द्या.
५ ते १० वयोगटातील मुले कोणतीही गोष्ट लवकर आत्मसात करतात. आजकाल अवगुणांचे कौतुक व पाठराखण होत आहे, हे चिंताजनक आहे. एका दिवसात व्यक्तिमत्व विकास होत नाही. मुलांमध्ये गुणांच्या स्पर्धा लावू नका. त्यांच्यातील गुणांना प्रोत्साहन द्या. त्यांना व्यावहारिक ज्ञान हे आई-वडीलांकडूनच मिळते. त्यांना प्रात्यक्षिकातून ते दाखवून द्या. पैसे कमावण्याचा प्रामाणिक मार्ग त्यांना समजावून सांगा. मुलांची जडणघडण माध्यमिक शिक्षण घेताना जास्त होते. त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावून त्यांचा कल पालकांनी ओळखला पाहिजे. याच काळात त्यांना वाचनाची गोडी लावली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप झवेरी यांनी केले.तर आभार राजेश देडिया यांनी मानले