येस न्युज नेटवर्क : रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अचानक पत्रकार परिषदेत रेपो दरात मोठी वाढ केली आहे. रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता रेपो दर ४.४० टक्के करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या म्हणण्यानुसार, रेपो रेटमध्ये वाढ कमोडिटीज आणि वित्तीय बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे लोकांवर ईएमआयचा बोजा वाढणार आहे. रेपो दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार, हे निश्चित आहे. आधीच महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांच्या बजेट कोलमडून जाणार आहे. सेंट्रल बँकेच्या या निर्णयानंतर गृहकर्ज आणि कार कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर वाढतील, त्यामुळे ईएमआयची रक्कम वाढेल.
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “मार्च २०२२ मध्ये किरकोळ महागाई झपाट्याने वाढली आणि ७ टक्क्यांवर पोहोचली. रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे गव्हासह अनेक धान्यांच्या किमती वाढल्या आहेत. या युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवरही वाईट परिणाम झाला आहे.” आरबीआयने साडेचार वर्षांनंतर पॉलिसी दरात वाढ केली आहे.