आज फक्त होळी पुढील आंदोलन याहून अधिक तीव्र राहील – ॲड.अनिल वासम
सोलापूर दिनांक – शासकीय पदांचे कंत्राटीकरण, शासकीय शाळा दत्तक योजना,संभाजी नगर व नांदेड येथील औषध व आवश्यक आरोग्य सुविधां अभावी निष्पाप रुग्णांचे झालेले मृत्युकांड, पत्रकार व विचारवंतांवरील भ्याड हल्ले, गोदूताई नगर येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आणि जड वाहतूक आदीं प्रश्न व मागण्या घेऊन युवा व जनता विरोधी शासन निर्णयाची आज फक्त होळी केली. यापुढील आंदोलन आणखी तीव्र असेल अशा इशारा युवा महासंघाचे जिल्हा सचिव ॲड.अनिल वासम यांनी दिला.
गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कल्बर्गी यांच्या नेतृत्वाखाली सरकारी नौकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा.शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळा दत्तक योजना रद्द करा. आरोग्य सुविधा अभावी दगावलेल्या निष्पाप मयतांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करा. गोदूताई परुळेकर नगर येथील जडवाहतुक आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आदीं मागण्या घेऊन राज्य सरकारच्या विरोधात शासन निर्णयाची होळी व निषेध धरणे आंदोलन पार पडले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडले.होळी करताना पोलीस आणि युवा कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या प्रतिमा जाळण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांना शिष्टमंडळ द्वारा निवेदन देण्यात आले.
निवेदन म्हटले आहे की, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ(DYFI) जिल्हा समिती च्या निवेदन देण्यात येत आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाने सर्वच क्षेतातील सरकारी नौकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा शासन निर्णय घेऊन कायमस्वरुपी रोजगार संपवण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरी करू पाहणाऱ्या युवकांचे स्वप्न धुळीस मिळवत आहे. संविधानाने दिलेले घटनादत्त आरक्षण पूर्णपणे ठप्प करू पाहत आहे. या जनता विरोधी शासन निर्णयाचा तीव्र विरोध करत असून हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी आहे.
शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ही ‘दत्तक योजना’ राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे देणगीदाराने सुचवलेले नाव संबंधित सरकारी शाळेस देता येणार आहे. देणगीदाराने शाळेस नवीन नाव दिल्यास सध्याचे नाव सदर नावाच्या पूर्वी किंवा नंतर लावता येईल असेही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील ६२ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक योजनेच्या नावाखाली कंत्राटदारांच्या घशात घालून, सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिक्षणाचे खाजगीकरण अत्यंत आक्षेपार्ह आहे.
आरोग्य सुविधांअभावी घडलेल्या संभाजी नगर, नांदेड व अन्य सरकारी इस्पितळांतील मृत्यूचे थैमान आणि यात दगावलेल्या मयातांच्या कुटुंबीयांना तात्काळ योग्य आर्थिक करा.तसेच राज्याचे आरोग्यमंत्री श्री. तानाजी सावंत यांना त्वरित बडतर्फ करा.
आमच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.
- सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करा.
- सर्व प्रकारचे सरकारी भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) याद्वारे राबवा.
- राज्य शासनातील लाखो रिक्त जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोग याद्वारे त्वरित भरा.
- सर्व प्रकारच्या आरक्षित जागा भरण्यासाठी काटेकोर अंमलबजावणी करावी.
- सर्व सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी रोजगार नोंदणी करण्यासाठी एम्पलॉयमेंट एक्सचेंज सारखे स्वतंत्र केंद्र उभा करावे आणि एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजद्वारे तात्पुरत्या पदांवर लोकांची नियुक्ती करा.
- ६२ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक योजनेच्या नावाखाली कंत्राटदारांच्या घशात घालनारा निर्णय रद्द करा.
•सार्वजनिक इस्पितळांत होत असलेल्या मृत्यूंचा तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एका सक्षम चौकशी समितीची नेमणूक करा.
- न्याय्य तपासाविना कुणाही निरपराध कर्मचाऱ्यावर कारवाई करू नका.
•सार्वजनिक आरोग्यावर भरीव आर्थिक तरतूद करून त्याचा योग्य विनियोग करा.
- एकूणच सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी राज्य शासनाने श्वेतपत्रिका काढा.
*सबब आपण शासनाचे प्रशासकीय अधिकारी व जिल्हाधिकारी म्हणून वरील मागण्यांबाबत योग्य हस्तक्षेप करून जनतेच्या न्याय हक्काच्या मागण्या शासनापर्यंत पोहचून जनाताभिमुख व कल्याणकारी निर्णय घेण्यास भाग पाडावे, यासाठी आज संघटनेच्या वतीने सनदशीर मार्गाने जनता विरोधी शासन निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे भविष्यात याचे पडसाद तीव्र उमटतील. शासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी.तसेच कॉ. गोदूताई परुळेकर नगर ही महिला विडी कामगारांची वसाहत आहे.या वसाहतीत पन्नास हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. या वसाहतीत अंतर्गत रस्ते अत्यंत खराब आणि मृतप्राय झालेले आहेत.यासाठी लोकांनी मोठा लढा उभारून लोकनेते,ज्येष्ठ कामगार नेते या वसाहतीचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आड मास्तर यांच्या नेतृत्वाखाली वसाहतीला जोडणारे दोन मुख्य रस्ते बनवण्यास जिल्हा प्रशासनाला भाग पाडले.या दोन रस्त्यांपैकी एक रस्ता विजय नगर ते कुंभारी अश्विनी हॉस्पिटल कडे जातो तर दुसरा रस्ता गोदूताई परुळेकर नगर मधून साखर कारखाना होटगी रोड कडे जातो.हा रस्ता नागरिकांसाठी आहे.या मार्गावर शाळा, विडी कारखाने व प्रार्थना स्थळ आहेत.लोकांची प्रचंड वर्दळ असते,शाळांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक असते.हे मार्ग अरुंद असून फक्त पायवाट आणि एकेरी वाहतूक चालू शकते.अशा मार्गावरून सर्रास जड वाहतूक चालू आहे.या विषयी वारंवार पोलीस प्रशासन आणि ग्राम पंचायत कडे लेखी,तोंडी तक्रार देऊन ही कोणतीच उपाययोजना होऊ शकली नाही.उलट यांच्या हलगर्जपणामुळे विद्यार्थी,महिला,कामगार दगावले,गंभीर अपघाती झाल्या.लोक या मार्गावर ये – करताना जीव मुठीत घेऊन चालतात.
तसेच वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. आबालवृद्धांना याचा त्रास होत आहे.बहुतांश लहान मुले व वृध्द लोकांना मोकाट कुत्री चावल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.याबाबत ही कॉ. गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे.
सबब जिल्हा प्रशासनाच्या वतीने गोदूताई परुळेकर नगर मधून होणारी जीवघेणी जडवाहतुक तत्काळ बंद व्हावी तसेच मोकाट कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा.
यावेळी अशोक बल्ला रफिक काझी बाळकृष्ण मल्याळ, मधुकर चिल्लाळ अप्पाशा चांगले नरेश गुल्लापल्ली सन्नी कोंडा दिनेश बडगु राहुल बुगले राकेश म्हेत्रे संतोष बोडा जैद मुल्ला मजहर आगवाले श्रीकांत बोगम अजय बोड्डु अनिल काडगी चंद्रकांत धोत्रे जावेद पठाण गोविंद सज्जन अप्पाशा निकंबे आदीसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.