महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूरच्या संत संमेलनाला मोठी गर्दी
सोलापूर, (प्रतिनिधी)ः- सनातन हिंदु धर्मातील प्रत्येकजण जागृत झाला तरच हिंदु राष्ट्राची निर्मिती होणार आहे. असे प्रतिपादन बागेश्वर धामचे पीठाधीश पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने होम मैदानावर आयोजित संत संमेलनामध्ये धीरेंद्र शास्त्री बोलत होते.
जागे व्हा जागे होण्याची वेळ आली आहे. आम्ही इस्लाम विरोधी नाही कोणत्याही धर्माच्या विरोधी नाही परंतु छेडेंगे तो छोडेंगे नही असेही त्यांनी सांगितले. हिंदु धर्मातील सर्वजण एकत्र झाले पाहिजे.
भारतभूमी पवित्र आहे आणि या भूमीत हसिनाला आणि सीमालाही सुरक्षित वाटते. महाराष्ट्र ही संताची, महान राष्ट्र भक्तांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. हिंदवी स्वराज्याची निर्मिती ज्यांनी केली ते छत्रपती शिवाजी महाराजही सर्व जाती धर्मांतील लोकांना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले. तरूणांनी नेहमी आनंदी राहिले पाहिजे घरातून बाहेर निघताना मनात हिंदु राष्ट्राची भावना असली पाहिजे. शरीराने संसारी आणि मनाने सन्याशी असले पाहिजे. प्रत्येक हिंदु जागृत झाला तरच जगामध्ये भारत सर्वश्रेष्ठ होणार आहे असेही आपल्या संतवाणीतून बागेश्वर धामचे पीठाधीश पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले. या कार्यक्रमाला होम मैदानावर भाविक भक्तांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. बागेश्वर बाबांच्या दर्शनासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी तरूणांनीही गर्दी केली होती. काही भाविकांच्या बागेश्वरबाबांनी समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उपाय सांगितले.
प्रारंभी स्वरध्यास संगित विद्यालयाच्या वतीने रसिका आणि सानिका कुलकर्णी यांच्याकडून ईश स्तवन, अभंग, कृष्णांची गीते सादर करण्यात आले. नंतर बागेश्वर बाबांचे मंचावर आगमन होताच त्यांचे महिलांकडून औक्षण करण्यात आले. त्यानंतर शंखनाद करून त्यांची सोलापूरातील दाते पंचागकर्ते मोहन दाते यांच्यासह 5 गुरूजींच्या हस्ते पाद्यपुजा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, मार्गदर्शक अविनाश महागांवकर, प्रमुख कार्यवाह जितेश कुलकर्णी,कोषाध्यक्ष अमोल धाबळे, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर, नाट्य परिषदेचे जयप्रकाश कुलकर्णी, श्रीपाद येरमाळकर, सुशांत कुलकर्णी, सात्विक बडवे, समर्थ होटकर आदींनी परिश्रम घेतले.
भाविकांची झुंबड
संत संमेलन संपल्यानंतर भाविक भक्तांनी मंचावर येवून बागेश्वर बाबा ज्या ठिकाणी बसून प्रवचन दिले त्या आसनाला भक्तीभावाने नतमस्तक होण्यासाठी झुंबड उडाली होती. भाविकांची अलोट गर्दी कार्यक्रमाला होती.
बागेश्वर बाबांचे पुन्हा सोलापूरला येण्याचे आश्वासन
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजित या संत संमेलनाचे नेटके भव्य दिव्य आयोजन आणि सोलापूरकरांची गर्दी प्रतिसाद पाहून बागेश्वर धामचे पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री भारावून गेले आणि पुन्हा सोलापूरला बोलवा मी येतो असे पुन्हा येण्याचे आश्वासन त्यांनी प्रशांत बडवे, अविनाश महागांवकर यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरला दिले.