येस न्युज मराठी नेटवर्क : ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण ठाकरे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता असंही यावेळी त्यांनी सांगितलं. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होतं, बदलत होतं. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. पुढे बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला होणाऱ्या वर्षपूर्तीनिमित्त भाष्य केलं.
“हे सरकार होणारच होतं. हे सरकार होणार नाही असं काही लोकांना वाटत होतं, पण माझ्यासारख्या काही लोकांना सरकार अशा प्रकारे घडेल असं वाटत होतं त्यानुसार झालं. हे सरकार १५ दिवसांत कोसळेल अशाही काही लोकांच्या पैजा लागल्या होत्या. पण सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार पूर्ण ताकदीने चाललं आहे. हे सरकार पाच वर्ष टिकेल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.