मोहोळ – कामती गावाला जोडणारा हराळवाडी येथील प्रमुख मार्ग करण्याच्या मागणीसाठी हराळवाडी ग्रामस्थांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत चिखलात ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा पै माऊली हेगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.लक्ष्मी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली.
देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७९ वर्षे उलटली, तरीदेखील हराळवाडी ते कामती हा रस्ता मार्गी लागलेला नाही. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, तसेच रुग्णालयात जाणारे वृद्ध नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

२०१९ पासून या रस्त्याच्या मागणीसाठी चार वेळा ग्रामपंचायतीतून ठराव करून शासनदरबारी सादर करण्यात आले. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सातत्याने या मागणीला कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी आंदोलनादरम्यान केला.
हराळवाडीत आठवडी बाजार भरत नसल्याने नागरिकांना कामती बाजारपेठेसाठी तसेच शासकीय कामांसाठी मोहोळला जाण्यासाठी या मार्गावर अवलंबून राहावे लागते. उन्हाळा व हिवाळ्यात हा रस्ता वापरण्यायोग्य असला तरी पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागते.
ग्रामस्थांनी तातडीने हा रस्ता मार्गी लावण्याची मागणी केली असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व पै.माऊली हेगडे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गायकवाड, ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत ढगे, सुनील जावीर, भारत गायकवाड, पांडुरंग बाड,दत्ता ऐवळे, सचिन मोटे, शिवाजी गायकवाड, जयराम शिंदे, पै. हनुमंत हराळे, भैय्या कोलारकर, मंजू हराळे, पै. बिरू माने, श्रीकांत मोटे सागर गायकवाड,बालाजी झाडगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.