सोलापूर – सोलापूर मध्ये गेली 2 महिने लॉकडाउन असल्याने बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे व्यापारी व सामान्य माणसाचे अर्थकारण बिघडले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सोलापूर संपूर्ण अनलॉक करण्यात आले. लॉकडाऊन संपल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनामध्ये पुन्हा वाढ होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर मधील नवीपेठ या गर्दीच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीनं जनजागृती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हनुमानाच्या वेषातील कार्यकर्त्यांच्या हस्ते मास्क आणि सॅनेटाईझरचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टसिंग पाळा, मास्क वापरण्याचा, लस घेण्याचा, वारंवार हात स्वच्छ करण्याचा संदेश देण्यात आला. भगवान हनुमान यांनी संजीवनी आणून राम-लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते त्याच उद्देशाने आजच्या कोरोनाच्या काळात मास्क आणि सॅनेटाईझर हे संजीवनीचे काम करत आहे त्यासाठी हनुमानाच्या वेशातील कार्यकर्त्यांच्या हस्ते मास्क आणि सॅनेटाईझरचे वाटप केले. बाजारपेठेतील वाढत्या गर्दीमुळे परत लॉकडाउनचे संकट सोलापूरवर येऊ नये यासाठी जनजागृती करणे आवश्यक होते कारण परत लॉकडाउन झाले तर ते कोणालाच परवडणारे नाही त्यामुळे मास्क, सॅनेटाईझर यांचे वाटप करून जनजागृती करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, लखन गावडे, बिरप्पा बंडगर, महेश कुलकर्णी, विकास शिंदे, अमोल सुरवसे, राहुल पांढरे, सिध्दनाथ चव्हाण आदी उपस्थित होते