सोलापूर : सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून विमान सेवा त्वरित सुरू करावी याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक 12 डिसेंबर पासून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर दररोज सकाळी 11 ते 12 या वेळेत हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर विचार मंचचे सदस्य संजय थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिद्धेश्वर कारखान्याने महापालिकेची परवानगी न घेता तसेच डीजीसीए यांची एनओसी न घेता आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे 92 मीटर उंचीची वीज निर्मितीची चिमणी उभारली आहे. आजच्या तारखेपर्यंत या प्रकल्पाला एनव्हायरनमेंटल क्लियरन्सचे प्रमाणपत्र नाही. जिल्हा न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद, मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांनी देखील ही चिमणी बेकायदेशीर असल्यामुळे आजवर कारखान्याचे सर्व दावे फेटाळले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी कारखान्याची सुनावणी घेऊन त्वरित निकाल देण्याबाबतचा आदेश दिला आहे तरीही याबाबत निकाल दिला जात नाही. बेकायदेशीर बांधलेल्या चिमणीला डीजीसीए कडून एनओसी मिळू शकत नाही त्यामुळे चिमणी पाडल्याशिवाय होटगी रोडवरील विमानसेवा सुरू होणार नाही आणि गेल्या दहा वर्षापासून आपण बोरामणी विमानतळाचे स्वप्न बघतोय आज पर्यंत तिथे काहीच झाले नाही त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये होटगी रोड वरून त्वरित विमान सेवा सुरू होऊ शकते मात्र याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे. सोलापूर विकास मंचने कोणतेही ठोस आश्वासन न घेता हे उपोषण बंद केले शिवाय महापालिका आयुक्तांनी बेकायदेशीर चिमणी बाबत निर्णय दिला नाही. त्यामुळे 12 डिसेंबर पर्यंत महापालिका आयुक्तांनी याबाबत निकाल द्यावा अन्यथा आम्ही बारा डिसेंबर पासून दररोज सकाळी 11 ते 12 या वेळेत सोलापूर महापालिकेच्या गेटवर दररोज हलगीनाद आंदोलन करणार आहोत.
मी संजय भिमाशंकर थोबडे , संस्थापक संचालक लिं. अप्पासाहेब थोबडे यांचा मुलगा आणि माजी तज्ञ संचालक, आपणांस अत्यंत खेदपूर्वक कळवितो की, आपला कारखाना हा मागील वर्षात ओढून ताणून ६ कोटी ₹ नफा दाखवून देखील ₹ १७० कोटी तोटयातच आहे. एम एस सी बॅंकेने एन सी एल टी कडे त्यांचे ₹ ८० कोटी थकबाकी असल्यामुळे आपला कारखाना अवसायनात काढून त्याचा लिलाव करून थकबाकी वसूलीचा दावा दाखल केला होता परंतु केवळ आपला कारखाना हा मल्टिस्टेट असल्यामुळे त्यातून वाचला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १-०९-२०२२ रोजी वातावरणीय परवाना तसेच वापर परवाना मिळवल्याशिवाय कारखाना चालू न करण्याचे आदेश दिलेला आहे.
नियमानुसार ५००० टीसीडी ( टन प्रतिदिन ) पेक्षा आपली क्षमता जास्त करावयाची असेल तर तत्पूर्वी आपणांस वातावरणीय परवाना घेणे अनिवार्य आहे. आपली क्षमता ही केवळ २५०० टीसीडी होती व आपण १९९९ सालापासूनच क्षमता वाढविणेचे काम सुरू केले आहे, जे आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद आहे. २००६ च्या गळीत हंगामातच आपण ५००० पेक्षा जास्त गाळप केले आहे. म्हणजे तत्पुर्वीच आपण वातावरणीय परवानगी घेतली पाहिजे होती. जी आपल्या तत्कालीन चेअरमन ज्यांना बॉम्बे हायकोर्टाने उद्धट, उर्मट , हेकेखोर तसेच कायम बेकायदेशीर वागणारा असे संबोधले आहे, त्याने त्यानुसारच हा परवाना घेतला नाही.२०१४ मध्ये जेव्हा ३८ मेगा वॅट कोजनरेशन आणि ७५०० टीसीडी पर्यंत क्षमता वाढविण्याचे काम चालू केले तेव्हाही अगोदर परवाना न घेताच बेकायदेशीरपणे काम चालू केलं. हा परवाना आजतागायत मिळालेला नाही आणि तेव्हापासून आपला कारखाना हा धर्मराज बेकायदाच चालवित आहे, हा झाला एक भाग.याचे चिमणीचे बांधकाम चालू केल्यावर , काम अर्धवट झाले असतानाच २०१४ साली, एअरपोर्ट अॅथोरीटी तसेच सोलापूर महापालिकेनी , सदरचे बांधकाम बेकायदेशीर असून ते पाडून टाकण्याची नोटीस दिली, तरी तमाम संचालक मंडळास अंधारात ठेऊन सदरचे बेकायदेशीर बांधकाम पुर्ण केले. आणि आपल्या हेकेखोर स्वभावानुसार आपली चूक कबूल न करता , तिचे आजतागायत समर्थन करीत कोर्टकचेरीत करोडो रूपये खर्च करीत आहेत.
आजपर्यंत अनेक वेळा, अनेक ठिकाणी खोटी प्रतिज्ञापत्रे दिलेली आहेत. प्रथम पासूनच साखरेची विक्री न करता, विनाकारण साठा शिल्लक ठेवत आले असून, सर्व साधारण पणे सरासरी ₹ ३०० कोटींचा साठा गृहीत धरल्यास, त्याचे वर्षाचे व्याज १२% प्रमाणे ₹३६ कोटी होते आणि २५ वर्षाचे व्याज ₹ ९०० कोटी, आपल्या सर्व सभासदांचे याच्या हेकेखोरपणाने वाया गेले आहेत. गत २५ वर्षात सरासरी ४ लाख टन प्रमाणे एक कोटी टन गाळप गृहित धरल्यास , टनाला ₹ ९०० एवढा जास्त भाव देणे शक्य होते. अथवा २५००० सभासद धरल्यास ₹ ३६००००/- प्रत्येक सभासदांस लाभांश ( डीव्हिडंट ) देऊ शकत होते, जे केवळ या एका व्यवहार शून्य माणसांमुळे वाया गेले आहे.
अथवा आपण स्वनिधीतून आणखी एक कारखाना उभा करू शकलो असतो. याकरीता माझी आपणांस नम्र विनंती आहे की, आपण या कायम बेकायदेशीर वागणाऱ्या माणसाकडून, आपले त्याच्या बेकायदेशीर वागण्याने झालेले नुकसान, भरपाई करून घेऊन त्याला आपल्या कारखान्यातून बेदखल केले पाहिजे, जेणे करून आपल्या कारखान्याचा विकास होऊ शकेल.
तर मी धर्मराज काडादीचे पाय धरून माफी मागेन – संजय थोबडे
सोलापूर — धर्मराज काडादी हे श्री सिद्धेश्वर कारखान्याचे संदर्भात खोटी वक्तव्यं करून,सोलापूरकरांची दिशाभूल करीत आहेत. माझ्यावर देखील त्यांनी खालच्या पातळीवरील बिनबुडाचे आरोप केले. मि काडादी यांना जाहीर आव्हान देतो की, त्यांनी मि विचारलेल्या खालील प्रश्नांची उत्तरे कागदोपत्री पुराव्यासह द्यावीत. माझे चुकीचे असल्यास मी धर्मराज काडादीचे पाय धरून माफी मागेन अन्यथा त्यांनी कारखान्याचे झालेले संपूर्ण नुकसान भरून देऊन ते भूषवित असलेल्या सर्व पदांचा राजीनामा द्यावा.
- २०१४ मध्ये एमपीसीबीने दिलेल्या कन्सेंटनुसार, आपल्याला एनव्हायरनमेंटल क्लिअरन्स मिळेपर्यंत विस्तारीकरणाचे कोणतेही काम करू नये असे स्पष्ट दिशा निर्देश दिलेले असतानाही आपण संपूर्ण विस्तारीकरण २०१४-२०१५ मध्येच पूर्ण केले आहे. आणि आजतागायत आपल्याला एनव्हायरनमेंटल क्लिअरन्स मिळालेला नाही. हे खरे आहे का खोटे ?
- आपल्याला २०१४ मध्येच चिमणीचे बांधकाम अर्धवट झाले असताना, सदरचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे व ते त्वरित पाडण्याचे दिशा निर्देश ४७८/२ अन्वये सोलापूर महानगरपालिकेने दिलेले असताना देखील, तुम्ही त्यास न जुनानता, चिमणीचे बांधकाम पूर्ण केले. हे खरे आहे का खोटे ?
- ५००० मे. टनांचे पुढे एनव्हायरनमेंटल क्लिअरन्स घेणे बंधनकारक असताना आणि आपण २००५-२००६ च्या गळीत हंगामातच त्यापेक्षा जास्त गाळप केलेले असताना देखील आपण एनव्हायरनमेंटल क्लिअरन्ससाठी २०१३-२०१४ मध्ये अर्ज केला. त्यानुसार आपण २००५-२००६ पासून आजतागायत कारखाना हा एनव्हायरनमेंटल क्लिअरन्स नसताना आपण समस्त सोलापूरकरांची, सभासद शेतकर्यांची आणि प्रशासनाची दिशाभूल करून, साम, दाम, दंड, भेद, नीती वापरून, कारखाना बेकायदेशीररित्या चालवित आहात. हे खरे आहे का खोटे ?
- आपणांस मा. उच्च न्यायालयाने रिट रिटीशन नं. ५२५३/ २०१७ यात, उर्मट , उध्दट तसेच कायम बेकायदेशीर वागणारा आणि मर्यादेपेक्षा जास्त उंचीची चिमणी बांधकामास परवानगी मिळणे अशक्य आहे हे माहित असतानादेखील तुम्ही बेकायदा चिमणीचे बांधकाम पूर्ण केले, असे मत नोंदवीले आहे. हे खरे आहे का खोटे ?
- एन टी पी सी ची चिमणी ही फार दूर आहे आणि त्यांच्याकडे डी जी सी ए ची एन ओ सी आहे हे देखील मा. उच्च न्यायालयाने त्याच निकालात म्हटले आहे. हे खरे आहे का खोटे ?
- बोरामणी विमानतळाकरिता लागणारी वनखात्याची जमीन, ही माळढोक पक्षी हे जगातून नामशेष होणाऱ्या प्रजाती मध्ये असल्याने, देणे अशक्य असल्याचे वन खात्याने कळविल्याचे, सर्वांना नीट माहित असूनदेखील, तुम्ही लोकांची दिशाभूल करण्याकरिता, वारंवार एन टी पी सी आणि बोरामणीचा जप करत असता. हे खरे आहे का खोटे ?
- तुमच्यावर चेक बाऊन्स, जुगार व इतर अनेक गुन्हे न्यायालयात दाखल आहेत. हे खरे आहे का खोटे ?