हुबळी : सरल वास्तू या नावाने प्रसिद्ध असलेले ज्योतिषी चंद्रशेखर यांच्या हत्येची घटना मंगळवारी समोर आली आहे. ज्योतिषाचार्य चंद्रशेखर कर्नाटकच्या हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये होते, यावेळी काही लोक त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये पोहचले होते. यावेळी हल्लेखोरांनी प्रथम गुरुजींच्या चरणांना स्पर्श करुन आशीर्वाद घेतले, त्यानंतर दुसऱ्याच सेकंदाला चाकूसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्लेखोरांनी गुरुजींवर जवळपास 17 हून अधिक वेळा वार केले आहेत. यातच त्यांचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद
ज्योतिषी चंद्रशेखर यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. आज दुपारच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी त्यांच्या जवळ येऊन चाकूसारख्या शस्त्राने वार केल्याचे दिसतेय, यामध्ये आरोपी हत्येनंतर घटनास्थळावरून पळ काढताना दिसत आहे.