कुंभारी – “कामगार वर्गाच्या संघर्षाशिवाय समाजाचे खरे मुक्तीकरण शक्य नाही.” कार्ल मार्क्स यांनी १५० वर्षांपूर्वी ‘भांडवल’ या ग्रंथातून मांडलेल्या या विचारांची आज अधिक तीव्रपणे जाणीव होत आहे” असे प्रतिपादन ज्येष्ठ हिंदी साहित्यिक व माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य कॉ. बादल सरोज यांनी माकपच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यकर्त्यांच्या अभ्यास शिबिरात केले.
ते पुढे म्हणाले,
“कामगाराने आपल्या धर्मातून निर्माण केलेल्या संपत्तीतून मिळालेले वरकड मूल्य भांडवलदार वर्ग हडप करतो” असे मार्क्सने १५० वर्षांपूर्वी आपल्या ग्रंथांतून सांगून ठेवले आहे. स्वरूप बदलेले असेल तरी आजही तीच परिस्थिती कायम असून, कामगारांच्या श्रमाचे शोषण कायम आहे. समाज दोन प्रमुख वर्गांत विभागला गेला आहे – भांडवलदार व कामगार, आणि हा वर्गसंघर्ष आज अधिक तीव्र झाला आहे. भांडवलशाहीच्या लोभी चारित्र्यामुळे आज देशासह जगभरात मंदी, बेरोजगारी व विषमता निर्माण होत आहेत. या विरोधात कामगारांचा संघर्ष राष्ट्रीय मर्यादा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा झाला आहे. आणि जनतेकडून जगभरात समाजवादी व सहकारी पर्यायाची मागणी होत आहे व त्याची तितकीच आवश्यकता आहे.”
कॉ. सरोज यांनी आपल्या विवेचनात पुढे स्पष्ट केले की, “कामगार चळवळ ही केवळ नोकरी वा पगारासाठीची झुंज नाही, तर ती अन्यायाविरुद्ध व पर्यायी समाजव्यवस्थेसाठीची लढाई आहे. मार्क्सचे विचार हे केवळ इतिहासातील संदर्भ नाहीत, तर आजच्या वास्तवाला दिशा दाखवणारे मार्गदर्शक आहेत.” राज्यभरातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी उत्साहाने चर्चेत सहभाग घेतला.
