सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात रुसा निधी अंतर्गत साकारण्यात आलेल्या वस्तीगृहाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी चार वाजता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
रुसा निधीमधून विद्यापीठ कॅम्पसमध्ये खास परदेशी विद्यार्थ्यांसाठी सदरील वस्तीगृह साकारण्यात आले आहे. या वस्तीगृहात एकूण 12 खोल्या असून त्या सर्व सोयी सुविधांनी सज्ज आहेत. एकूण 24 विद्यार्थी यामध्ये राहू शकतात. त्याचे उद्घाटन उद्या (शुक्रवारी) दुपारी चार वाजता पालकमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या नवीन वस्तीगृहामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये आणखीन एका नव्या इमारतीची भर पडली आहे. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या निवासाची यामुळे सोय होणार असल्याचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमास अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.