पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. परंतु कोणत्या वर्षातील कारखान्यातील जीएसटीची कागदपत्रे तपासण्यात येत आहेत. याबाबत गूढ कायम राहिले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या विविध संस्थांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. त्यानंतर काही महिन्यांचा कालावधी उलटला नाही, तोपर्यंत जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल कारखान्यावर मंगळवारी छापा टाकला. हे अधिकारी नेमक कोणत्या कालावधीतील हिशेब तपासत आहेत हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
मागील वर्षी कारखान्याचे सभासद संजय पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या विरोधात तक्रार केली होती. त्यामुळे अधिकारी तपासणीला आले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गाळपाची, साखरेची, मळी, ऊस भुसा, प्रेसमड, मोलॅसिस यांच्या विक्रीतून कारखान्याला उत्पन्न मिळत असते. हे व अन्य साहित्य विक्री करताना कारखान्याने जी. एस. टी. भरला आहे का? याची देखील तपासणी होण्याची शक्यता असल्याची चर्चा दिवसभर पंढरपूरमध्ये रंगली होती.