जिल्ह्यातील तीन हजार बचत गटांना 40 कोटी 71 लाख रुपयांचे वाटप
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सक्षम करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची नाबार्ड अंतर्गत बचत गटांना सूक्ष्म कर्ज वाटप योजना प्रभावी ठरत आहे. दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब व्यक्ती, महिला, शेतमजूर, सूक्ष्म व छोटे उद्योजक, ग्रामीण कारागीर यासारख्या समाजघटकांना या योजनेचा फायदा होताना दिसत आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तिंचे उत्पन्न अल्प असते. त्यांच्याकडे पुरेसे तारणही नसते. त्यामुळे हा घटक बँकिंग सेवा सुविधांपासून वंचित राहत होता. ही बाब रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांच्या निदर्शनास आली. त्या पार्श्वभूमीवर ‘ना कारण ना तारण’ या तत्त्वावर नागरिकांचे शून्य बाकी वर बँकांमध्ये सेव्हिंग खाते उघडण्यात आले. त्यातून या व्यक्तिंना एका बाजूला काटकसर करून बचतीची सवय लावणे व दुसऱ्या बाजूला त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी खेळते भाग भांडवल म्हणून समुह ग्रुप (जे.एल.आय.जी ग्रुप) योजना जिल्हा बँकेचे तत्कालीन प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यास सुरुवात केली. प्राथमिक तत्त्वावर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, माढा व पंढरपूर या तालुक्यांमध्ये यश मिळाल्यानंतर बँकेमार्फत ही योजना संपुर्ण जिल्ह्यासाठी राबविण्यात आली. याबाबतची माहिती जेएलजीचे क्षेत्रिय निरीक्षक विलास घाडगे यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जून 2018 ते सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये 3 हजार 282 बचत गट व 13 हजार 271 सभासदांना 40 कोटी 71 लाख 65 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. यामध्ये भाजी विक्रेते, शिलाई काम, बांगड्याचा व्यवसाय, डबे बनवणाऱ्या महिला, पोळपाट बनविणे, ब्युटी पार्लर, वडापाव अशा वेगवेगळ्या व्यवसाय करणाऱ्या 70 प्रकारच्या व्यावसायिक महिलांना जिल्हा बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात आला. हा कर्जपुरवठा झाल्यामुळे त्यांच्या व्यवसायामध्ये आणि परिणामी उत्पन्नात अतिशय चांगल्या पद्धतीने वाढ झाली व त्यांना बचतीचीही सवय लागली. गटातील सदस्यांना अतिशय अल्प हप्त्यामध्ये कर्ज विमा व अपघात विमा दोन्हीही सुविधा देण्यात आल्या. त्यामुळे कोरोना कालावधीमध्ये एखादा कर्जदार मयत झाल्याप्रसंगी त्याच्या वारसास विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत झाली.
जिल्हा बँकेची दुसरी लाईव्ह स्टॉक योजना या योजनेमध्ये खाजगी दूध डेअरी संस्थांना कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये चार किंवा सहा सदस्यांचा गट करण्यात आला. एकाच विचाराचे तसेच एकमेकांवर विश्वास दाखवणारे गट तयार करण्यात आले. सदरच्या डेअरीला 50 हजार प्रति सभासद प्रमाणे एका गटात तीन लाख रुपये वाटप करण्यात आले. जे एल जी व लाईव्ह स्टॉक या योजनेमार्फत प्रति सभासद 75 हजार प्रमाणे एका गटात चार लाख 50 हजाराचे वाटप करण्यात आले. खाजगी दूध संस्थांना जिल्हा बँकेमार्फत कर्जपुरवठा केल्यामुळे आज यशस्वीरित्या व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहेत. त्यामुळे सामान्यातील सामान्य सभासद व ग्रामीण भागातील सूक्ष्म घटक यांच्या सोलापूर जिल्हा बँकेने त्यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात बदल घडवून आणला आहे.