सोलापूर : प्रजासत्ताकदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने आयुष मंत्रालय, पतंजली योग समिती, गीता परिवार, हार्टफुलनेस, नॅशनल योगासन स्पोर्टस असोसिएशन आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दुपारी ४ ते ६ या वेळेत श्री सिद्धेश्वर मंदिर येथील शिवयोगी समाधी जवळील प्रांगणात योगशिक्षक आणि साधक अशा ५० जणांनी पांढरा ड्रेस परिधान करून आठ मिनिटांमध्ये १३ सूर्यनमस्कार घातले आणि शहिद बांधवांना अभिवादन केले.
पतंजली योग समितीचे पूज्य रामदेवबाबा यांच्या आदेशानुसार भारतामधून ७५ करोड सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यामध्ये सोलापुरातून एकूण ३१ ठिकाणी सूर्यनमस्काराचा कार्यक्रम पार पडला. सिद्धेश्वर मंदिरात पतंजली योग समितीच्या वरिष्ठ राज्य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात योगशिक्षक आणि साधक यांनी सूर्यनमस्कार घालून ७५ कोटी सूर्यनमस्कारामध्ये आपले योगदान दिले.
यावेळी रघुनंदन भुतडा, प्रकाश जाधव, विजय भुतडा ,अविनाश अळ्ळीमोरे, दिनकर कापसे, रजनी अवसेकर, रघुनाथ क्षीरसागर, वंदना नानकर दिपाली प्रवीण कुर्विनकोक, मंदाकिनी पाटील, श्रद्धा कुलकर्णी, पूजा शहा, प्रीती गोयल, भगवान बनसोडे यांच्यासह योगशिक्षक आणि साधक उपस्थित होते.
समृद्ध – निरोगी भारत
२६ जानेवारी रोजी सोलापूर शहरामध्ये एकूण ३१ ठिकाणी आठ मिनिटांमध्ये १३ सूर्यनमस्कार घालून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सोलापूर शहरातला मुख्य कार्यक्रम सिद्धेश्वर मंदिरामध्ये शासनाचे संपूर्ण नियम पाळून साजरा करण्यात आला. ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सूर्यनमस्काराचा कार्यक्रम साजरा केला .”फिट इंडिया”च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देशाला सूर्यनमस्काराच्या माध्यमातून स्वतःचे आरोग्य सांभाळा आणि एक समृद्ध भारत, निरोगी भारत बनविण्याचे आवाहन केले होते. या संदेशाचे पालन करत संपूर्ण भारत वर्षात एकाचवेळी चार ते सहा या वेळेमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि आपल्या भारत मातेच्या लाडक्या सुपुत्राला आदरांजली वाहिली आहे.
- सुधा अळ्ळीमोरे, पतंजली योग समिती, राज्य वरिष्ठ प्रभारी, सोलापूर
शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्वास्थ्य
परमपूज्य स्वामीजी यांच्या आदेशानुसार भारतामधून ७५ करोड सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला होता. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पतंजलीच्या माध्यमातून १३ सूर्यनमस्कार घातले आहेत .वास्तविक सूर्यनमस्कार का घालावेत त्यामागचं खरं कारण म्हणजे सूर्याला नमस्कार घालून सूर्यनमस्कार घालतो. सूर्याची जी प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा आहे, ती सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि त्या उर्जेमुळे आपल्या शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, बौद्धिक स्वास्थ्य हे व्यवस्थित राहून आपले शरीर निरोगी, औषधमुक्त त्याचप्रमाणे लवचिक राहण्यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदा होतो. तसेच आपले पोटाचे कार्य, पचनसंस्था हे व्यवस्थित राहते. त्यामुळे आपल्याला निरोगी स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभते.
- प्रकाश जाधव, पतंजली योग समितीचे सदस्य
सूर्यापासून मिळते ऊर्जा
सूर्यनमस्कार एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे . प्रत्येक अवयवाला याठिकाणी व्यायाम दिला जातो. फिट इंडिया अर्थात प्रत्येक अवयव व्यवस्थितरित्या कार्यक्षम रहावा ,सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आपल्या शरीराला उपयुक्त असते, ती मिळावी, यासाठी आपण हे सूर्यनमस्कार दररोज नियमितपणे घातले पाहिजेत, सातत्य असेल तर त्याचा फायदा आपल्या शरीराला निश्चित होतो, म्हणून सर्वांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत.
- रघुनाथ क्षिरसागर