येस न्युज मराठी नेटवर्क : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नेतृत्तावाखालील राजवटीमध्ये खेळांना प्रोत्साहन दिलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट नियमक मंडळाने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अफगाणिस्तानचा संघ यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पहिल्यांदाच अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी सामना खेळणार असून या दौऱ्यासाठी तालिबानने हिरवा कंदील दाखवल्याचं अफगाण क्रिकेट मंडळाने स्पष्ट केलंय. अफगाण क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमिद शिनवारी यांनी यासंदर्भातील माहिती दिलीय. ऑस्ट्रेलिया दौराच नाही तर भारताविरोधातील कसोटी मालिका खेळण्यासाठीही अफगाणिस्तानचा संघ दौरा करण्याची शक्यता हमिद यांनी व्यक्त केलीय.
“तालिबान सरकारचा क्रिकेट खेळण्याचा पाठिंबा आहे. त्यामुळेच नियोजित वेळापत्रकानुसार आमच्या संघाचे सर्व दौरे पार पडणार आहेत. तालिबान संस्कृतिक विभागाच्या प्रवक्त्यांनी ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यासाठी समर्थन देत असल्याचं आम्हाला कळवलं आहे. तसेच त्यांनी २०२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठीही त्यांनी परवानगी दिलीय,” असं हमिद म्हणालेत.