मुंबई : मुंबईत भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी ग्रामपंचायत, महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. सोबतच विधानपरिषद निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय राम मंदिर निधी, कार्यलय निर्माण या मुद्द्यांवरही चर्चा झाली. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी टी रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैया, संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे उपस्थित आहेत
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
विधानपरिषद निवडणुकांचा आढावा
विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. खासकरुन नागपूरची विधानपरिषद जागा पाच दशकानंतर पराभव झाल्याची सल बैठकीत व्यक्त करण्यात आली. उमेदवार निवडीत चूक झाली का? मतदार नोंदणी आणि संपर्कात कमी पडलो का? तीन पक्ष एकत्र आल्याने पराभव झाला का याप्रश्नांचा उहापोह बैठकीत करण्यात आला.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणनीती
येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर कोअर कमिटीमध्ये विस्तृत चर्चा झाली. यात 12 नेते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राज्यभर प्रचार करणार असल्याचं निश्चित करण्यात आलं. यात काही नेत्यांकडे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जिल्हानिहाय जबाबदारी देण्यात येणार आहे. यात आशिष शेलार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे.