सोलापूर – मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. 15 जुलै 2025 रोजीच्या पत्रान्वये सहकारी संस्थांनी सादर करावयाच्या सहकार पुरस्कार सन 2023-24 साठी दि.18 जुलै 2025 ऐवजी दि.31 जुलै 2025 पर्यंतची मुदत वाढवून दिलेली आहे.
त्याअनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये सदर कामासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्याकडून सहकार पुरस्कार प्रस्ताव तयार करण्यासाठी संस्थांनी मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव तयार करावेत. कोणतीही इच्छूक व पात्र संस्था पुरस्कार प्रस्तावापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी घ्यावी असे आदेश जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अधिकारी किरण गायकवाड, यांनी दिले आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थां प्रकारातील किमान 3 संस्थांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास दि.31 जुलै 2025 पर्यंत 3 प्रतीत तालुका लेखापरीक्षकाच्या मदतीने स्वतः सहाय्यक निबंधक यांनी तपासून प्रत्येक मुद्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या कागदपत्राच्या सत्यप्रतीसह सादर करावेत अशा सुचना सर्व तालुका कार्यालयास दिल्या आहेत. तालुका कार्यालयाकडून प्राप्त झालेले प्रस्ताव निकषानुसार परिपूर्ण असल्याची खात्री करून घेण्यासाठी संस्था प्रकारनिहाय नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती जिल्हा कार्यालयात केलेली असून सदर अधिकाऱ्यामार्फत तपासणी करून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केले जाणार असल्याने संस्थांनी आवश्यक त्या कागदपत्राच्या सत्यप्रतीसह परिपूर्ण प्रस्ताव विहीत मुदतीत जिल्हा कार्यालयाकडे तालुका कार्यालयाच्या शिफारशीने सादर करणेबाबत संस्थांना कळविले आहे.
सहकार पुरस्कार सन 2023-24 च्या अनुषंगाने संस्था प्रकारनिहाय निकष व गुणांकन याची माहिती सहकार आयुक्तालयाच्या http://sahakarayukt.maharashtra.gov.in यासंकेत स्थळावरून उपलब्ध असून एन.सी.डी. पोर्टलवर संस्थेची माहिती अद्ययावत भरून संस्थेने त्यांचा सहकार पुरस्कार प्रस्ताव संबंधीत सहाय्यक निबंधक यांचे कार्यालयामध्ये दिनांक 31 जुलै 2025 पुर्वी दाखल करण्याचे आवाहन मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांनी सर्व संस्थांना केले आहे.