सिडनी : ऑस्ट्रेलियासोबत तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय संघाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. संपूर्ण भारतीय संघाचा करोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील रेस्तराँमध्ये करोनासंबंधित नियमांचं उल्लंघन करताना दिसल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यामुळे भारतीय संघाला करोना संकटाचा सामना करावा लागतो का काय? अशी शंका निर्माण झाली होती.
“३ जानेवारीला भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची करोना चाचणी करण्यात आली. सर्व चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे,” अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली. एकीकडे खेळाडूंनी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ऑस्ट्रेलियामधील मीडिया लक्ष्य करत असताना भारतीय संघाने मात्र संपूर्ण लक्ष सिडनीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याकडे केंद्रीत केलं होतं. ७ जानेवारीपासून सिडनीमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.