येस न्युज मराठी नेटवर्क : वर्षाच्या सुरूवातीलाच कोरोनानं देशात शिरकाव केला. त्यानंतर पूर्ण वर्ष करोनाच्या मगरमिठीत गेलं. पण, आता वर्ष मावळतीकडे झुकलेलं असताना देशातील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर देशवासीयांना दिलासा मिळणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात मागील २४ तासात २० हजारांपेक्षाही कमी करोना रुग्ण आढळून आले आहेत.
देशात मागील २४ तासांत १८ हजार ७३२ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी १ लाख ८७ हजार ८५० इतकी झाली आहे. नवीन रुग्णांबरोबरच देशात २४ तासांत २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २ लाख ७८ हजार ६९० रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ९७ लाख ६१ हजार ५३८ जण करोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात २१ हजार ४३० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.