येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनावरील प्रभावी लस कधी येणार आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच एबीपी न्यूजने दिल्लीतील एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांच्याशी खास बातचित केली आहे. त्यावेळी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, ‘देशातील 100 टक्के लोकांना कोरोनाची लस देण्याची गरज नाही. 50 ते 60 टक्के लोकांना वॅक्सिन दिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. तो वाढणार नाही.’
डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, “लसिकरण करण्याची दोन उद्दिष्ट आहेत. ज्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका आहे, त्या लोकांना कोरोना लस देण्यात येणार आहेच. दुसरं म्हणजे, आम्हाला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचाय. जेणेकरून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल. त्यासाठी जर देशातील 50-60 टक्के लोकांना वॅक्सिन दिलं तर व्हायरसचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. व्हायरसचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संसर्ग होणार नाही. अशाप्रकारे कोरोनाची रुग्णसंख्याही आटोक्यात येईल. 100 टक्के लोकांना लस देण्याची गरज भासणार नाही.”