जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव जरी देशात वाढत असला तरी, दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढतच आहे. देशात सध्याच्या घडीला कोरोनामुक्त झालेल्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंत तब्बल ५ लाख १५ हजार ३८५ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ३१ हजार ९७८ आहे. देशपातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२.७८ टक्क्यांवर पोहचले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालायकडून सांगण्यात आले आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या पुढे गेली आहे. २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ झाली आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.
दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सातत्याने विविध राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ताज्या माहितीनुसार, रुग्ण वाढीची ही साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी गरजेप्रमाणे स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाउन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, राज्यात पुणे आणि ठाण्यात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर केरळमधील थिरुवअनंतपुरम तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.