मागील चोवीस तासात सोन्याच्या दरात एका हजार रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी जळगावच्या सुवर्णनगरीत आज (18 मार्च) सोन्याचे दर 59 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत.
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन साठ हजार रुपये प्रति तोळा इतक्या विक्रमी भावाची नोंद करण्यात आला होती. मात्र त्यानंतर एक महिन्याच्या काळात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत होती. परंतु गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं दिसून आलं. मागील चोवीस तासात सोन्याच्या दरात एका हजार रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी जळगावच्या सुवर्णनगरीत आज (18 मार्च) सोन्याचे दर 59 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत.
इतिहासातील सर्वाधिक दर
जळगावमध्ये काल (17 मार्च) सकाळी सोन्याचा दर जीएसटीशिवाय 58 हजार 300 रुपये इतका होता. तर आज हाच दर 59 हजार 300 रुपये आणि जीएसटीसह 61 हजार 080 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचला आहे. सोन्याच्या इतिहासातील हा सर्वाधिक दर असल्याचं सोने व्यापारी सांगत आहेत.
अमेरिकेती बँका बुडाल्याने सोन्याच्या दरात वाढ?
अमेरिकेतील मोठ्या बँका बुडल्याचा परिणाम म्हणून सोन्याचे दर वाढले असल्याचं बोललं जात आहे. बँका बुडण्याच्या या घटनेने जागतिक पातळीवर बँकेवरील विश्वास कमी होऊन गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वळवला. यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन दर हे 61 हजार रुपयांच्या वर जाऊन पोहोचला आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी मात्र खरेदीकडे पाठ फिरवल्याचं चित्र आज जळगावच्या सुवर्णनगरीत पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांना हे दर परवडणारे नाहीत.
‘आता नकली दागिने घालून फिरावे लागेल’
सोन्याचे दर 61 हजार झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या अवाक्याबाहेर गेल्याने आमचे सोने खरेदीचं बजेट बिघडले आहे. वाढलेल्या या दरात आता सोन्याची कमी प्रमाणात खरेदी करावी लागणार आहे. सोन्याचे हे दर पाहिले तर आता सोन्याची हौस पूर्ण करायची असेल तर नकली दागिने घालून फिरावे लागेल, अशी प्रतिक्रिया बबिता चौधरी नावाच्या ग्राहकाने यांनी दिली आहे.
दागिन्यांची शुद्धता कुठे तपासाल?
दरम्यान भारतात सुरक्षित गुंतवणूक म्हणून कायमच सोन्याकडे पाहिलं जातं. पण सोन्या-चांदीचे दर नेहमीच कमी-जास्त होत असतात. सकाळी पाहिलेले दर संध्याकाळपर्यंत सारखेच असतील याची खात्री देणं तसं कठीणच आहे. परंतु लग्नासाठी किंवा गुंतवणूक म्हणून देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला ठरु शकतो. तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.