येस न्युज नेटवर्क : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचा 20 वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग याला मात देत विजय मिळवला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात सेननं तीन पैकी दोन सेट जिंकत19-21, 21-9, 21-16 च्या फरकाने सामना जिंकला आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 20 वं सुवर्णपदक आहे. तर, भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 57 पदकं जिंकली आहेत. ज्यात 15 रौप्यपदक आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे.
लक्ष्य सेन आणि यॉन्ग यांच्यातील सामना अत्यंत रोमहर्षक असा झाला. सामन्यात सुरुवातीपासून दोन्ही खेळाडू अगदी अटीतटीची टक्कर देत होते. पहिल्या सेटमध्ये यॉन्गने केवळ दोन गुणांच्या फरकाने 19-21 ने सेट जिंकत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. पण दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यनं जबरदस्त पुनरागमन करत एकतर्फी विजय मिळवला. 21-9 अशा फरकाने लक्ष्यनं सेट जिंकत सामन्यात 1-1 ची आघाडी घेतली. ज्यानंतर अखेरचा निर्णयाक सेट कमालीचा चुरशीचा झाला. लक्ष्य आघाडीवर असतानाही यॉन्ग त्याचा पाठलाग करतच होता. पण अखेर यॉन्ग 16 गुणांवर असताना लक्ष्यनं 21 गुण पूर्ण करत सेट आणि सामना जिकंत सुवर्णपदकावर नाव कोरलं.