मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा आंदोलन उग्र रूप धारण करेल – कॉ. आडम मास्तर
सोलापूर दि. २:- मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गात घोषित केल्यामुळे आणि त्याअनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण आणि अपवादात्मक परिस्थितीमुळे भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून राज्य शासन या प्रश्नी आवश्यक तो निर्णय घेऊ शकेल. मात्र अद्यापही याबाबत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. म्हणून आक्रमक होऊन मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरावे लागले. सबंध महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. हि प्रमुख मागणी घेऊन बेमुदत साखळी उपोषण आणि आमरण उपोषण चालू आहे. याला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) चा जाहीर पाठींबा असून आम्ही या आंदोलनात सक्रियपणे उतरण्याची ग्वाही देत आहे. अशा शब्दात पाठींबा देऊन सरकारच्या आडमुठीधोरणांवर परखड टीका केली.
रे नगर ला देण्यात आलेली नोटीस रद्द करून लाभार्थ्यांना मीटरसह नवीन जोडणी नाममात्र ५०० रुपये दराने द्यावे, विद्युत स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, १ ऑक्टोबर पासून वाढीव वीज दर रद्द करावे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाचे खाजगीकरण रद्द करावे, कॉ. गोदुताई परुळेकर वसाहतीतील अंतर्गत नवीन रस्ते वा रस्त्यांचे पुर्नडांबरीकरण करण्यात यावे. या मागण्या मान्य नाही झाल्यास दिवाळीनंतर मुंबईच्या आझाद मैदानावर ३० हजार श्रमिक कष्टकऱ्यांना घेऊन निर्णयाक आरपारची लढाई करण्याचा वज्र निर्धार पूनम गेट येथे झालेल्या जाहीर सभेत कॉ. आडम मास्तर यांनी केला.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्यावतीने गुरुवार २ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद पूनम गेट येथे विविध न्याय हक्काच्या मागण्या घेऊन ज्येष्ठ नेते कॉ. नरसय्या आडम (मास्तर), सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाद्वारे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना शिष्टमंडळाद्वारे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात सिटू च्या राज्य उपाध्यक्षा कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. सुनंदाताई बल्ला, शकुंतला पाणीभाते, ॲड. अनिल वासम, विक्रम कलबुर्गी, वीरेंद्र पद्मा, राजू काकी, आरिफ मणियार आदी उपस्थित होते. सदर निवेदनाची प्रत ईमेल द्वारा मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.गृहनिर्माण मंत्री, मा. पालकमंत्री, मा. ग्राम विकास मंत्री, मा. मुख्यसचिव, मा. विभागीय आयुक्त, मा. मुख्य अभियंता व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मा. प्रधान सचिव ऊर्जा विभाग आदींना पाठविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, शेवंताताई देशमुख, म.हनीफ सातखेड, मुरलीधर सुंचू आदी उपस्थित होते.
यावेळी सभेला संबोधित करताना कॉ. आडम मास्तर म्हणाले कि, आज संपूर्ण देशात केंद्र सरकारने सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण हा एक कलमी कार्यक्रम हाती घेतलेला असून या अनुषंगाने सर्वसामान्य माणसे व मध्यमवर्गीयांना थेट फटका बसत आहे. जनताविरोधी धोरणे राबविणाऱ्या सरकारविरुद्ध रस्त्यावर येण्याची नितांत गरज आहे. सोलापूर सारख्या कामगार, कष्टकरी, श्रमिक बहुल भागात कित्येक बेघर, भाड्याच्या घरात आपली गुजराण करत आहेत. यांना हक्काचे घर द्यावे म्हणून सिटूने पुढाकार घेऊन पहिल्यांदा कॉ. गोदूताई नगर १०००० व कॉ. मीनाक्षीताई साने वसाहत १६०० असे ११६०० महिला विडी कामगारांची वसाहत कुंभारीच्या माळरानावर उभी केले. त्यानंतर हजारो असंघटीत कामगार सिटूकडे निवाऱ्याचा प्रश्न घेऊन सातत्याने पाठपुरावा केले असता सिटूने पुढाकार घेऊन ३० हजार असंघटीत कामगारांना हक्काचे घर मिळावे म्हणून रे नगर फेडरेशनची स्थाप ना केली. याला पंतप्रधान आवास योजना अंतर्गत (शहरी भाग) परवडणाऱ्या किमतीत घर नाही त्याला घर देण्यासाठी सरकारने गृहनिर्माण योजना जाहीर केली. त्या अनुषंगाने सोलापूरात ३० हजार असंघटीत कामगारांकरिता रे नगरच्या माध्यमातून जगातील एकमेव पथदर्शी, महत्वाकांक्षी एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने अनुदानासहित मान्यता दिली. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे पायाभूत सुविधांसह बांधकाम पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. याकरिता गेल्या १५ वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. याचा हस्तांतरण सोहळा साधारणतः नोव्हेंबरच्या अखेरीस पंतप्रधान यांच्याहस्ते होऊन रे नगर च्या लाभार्थ्यांना हक्कांच्या घरांचा ताबा मिळणार आहे. या लाभार्थ्यांना पायाभूत सुविधांपैकी अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, मुबलक पाणी उपलब्ध असून नवीन वीज जोडणीकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने दि. १२ जानेवारी २०२२ रोजी रे नगर फेडरेशनला पत्राद्वारे कळविले आहे त्यात, प्रति घर जोडणी १०३०८ रुपये इतके प्रत्यक्ष लाभार्थ्यांनी भरावे तरच नवीन विद्युत जोडणी केली जाईल असे संस्थेला पत्र प्राप्त झाले.
वास्तविक पाहता रे नगर च्या लाभार्थ्याना प्रति घर जोडणी १०३०८ रुपये भरून नवीन वीज जोडणी घेणे अशक्यप्राय आहे. यात फक्त हा स्मार्ट मीटर इतकाच भाग नसून त्यात आधुनिक पध्दतीने रीचार्जची पध्दत अवलंबिण्यात येणार आहे. यामुळे जसे मोबाईल चार्ज करतो तसा प्रकार असून यात मोठी लूट होण्याची शक्यता आहे. यामुळे अतिरिक्त आर्थिक बोजा प्रत्यक्ष लाभार्थ्यांवर पडणार आहे. मात्र यासंबंधी वेळोवेळी राज्य शासनाकडे अत्यंत माफत नाममात्र ५०० रुपये दरात प्रति घर जोडणी देण्यासंबंधी पत्रव्यवहार व बैठकीचे सत्र सुरु आहे. परंतु राज्य सरकार नवीन वीज जोडणीबाबत स्मार्ट मीटरची नवीन योजना जाहीर केल्यामुळे सर्वसामान्य आणि लाभार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. अर्थातच दुष्काळात तेरावा महिना हि गत होणार आहे.
देशात विजेची सगळ्यात जास्त थकबाकी बडे भांडवलदार, कारखानदार, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींची आहे. सर्वसामान्य श्रमिक कामगारांची थकबाकी अत्यंत तुरळक असते. तरी सुध्दा महावितरण कंपनीकडून मुजोर पद्धतीने सक्तीची वसुली करण्यात येते, न विचारता वीज तोडणी केली जाते, जोडण्यासाठी अतिरिक्त पैशांची आकारणी केली जाते. हा श्रामिकांवरचा अन्याय आहे. १ ऑक्टोबर २०२३ पासून सर्वत्र विजेची दरवाढ करण्यात आली ती रद्द केली पाहिजे.
आजही शहर आणि ग्रामीण भागात अशिक्षिततेचे प्रमाण अधिक आहे. लोक अद्याप यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाबद्दल जागृत नाहीत. अशावेळी विजेचे स्मार्ट मीटर हाताळणे सर्वसामान्य नागरिकांना अवघड आहे. श्रमिकांना रोजंदारी, दरमहा मजुरी मिळते. ती मजुरी नियमितपणे मिळतेच असे नाही. यातील बहुतांश श्रमिक हे स्वयंरोजगार किंवा छोट्या-मोठ्या कारखान्यात मजुरीला जात असतात. अशावेळी सध्या वीज बिल अदा करण्यासाठी मीटरचे रीडिंग घेतल्यापासून किमान किमान २० दिवसांची मुदत असते. त्यावेळेत लोक प्रामाणिकपणे पैशांची जमवा जमावी करून वीजबिल अदा करतात. परंतु स्मार्ट मीटर हे पूर्णतः एखाद्या मोबाईल रिचार्ज प्रमाणे असल्यामुळे आगाऊ पैसे भरणे अनिवार्य असते. हे पूर्ण तांत्रिक दृष्ट्या असल्यामुळे मुदत कधी संपते याची पूर्व कल्पना नसते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. सदर स्मार्ट ची पाहणी, चाचणी, दुरुस्ती याची माहिती याबद्दल नागरिकांना कोणतीच पूर्व कल्पना नाही. त्यामुळे नक्कीच लोकांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागेल. हि वस्तुस्थिती नाकारता येत नाही. स्मार्ट मीटर हे मोठ्या प्रमाणात महाकाय व विकसित शहरांमध्ये याचा वापर होऊ शकतो. याला अपवाद म्हणजे देशातील सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश सारख्या राज्यात स्मार्ट मीटर ची योजना सपशेल फसले आहे. हे देखील विचारात घेतले पाहिजे. एकंदरीत सार्वजनिक उद्योगधंद्यातील सरकारी मालकीचे वीज महामंडळ हे देशातील बड्या भांडवलदारांसाठी खुले करून देण्यासाठी हि योजना आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केवळ नफेखोरीसाठी धडपडणाऱ्या या यंत्रणेकडून सर्वसामान्यांचे नुकसान अटळ आहे.
तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते १ सप्टेंबर २००६ साली कॉ. गोदुताई परुळेकर वसाहतीतील १० हजार श्रमिकांच्या घरांचे हस्तांतरण करण्यात आले असून या वसाहतीत साधारणतः ६० हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. आजमितीस या वसाहतीतील अंतर्गत नवीन रस्ते वा रस्त्यांचे पुर्नडांबरीकरण अद्याप झालेले नाहीत. २००८ साली कॉ. नरसय्या आडम (मास्तर) हे आमदार होते. तेंव्हा महाराष्ट्र राज्य सरकारच्या विशेष निधीतून अंतर्गत रस्ते बनविण्यात आले. त्यानंतर या वसाहतीत जिल्हा प्रशासन व शासनामार्फत कोणताही निधी उपलब्ध न झाल्याने अंतर्गत रस्ते हे मृतप्राय झालेले आहेत. या रस्त्यावर दररोज छोटे-मोठे अपघात, अपघाती मृत्यू चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिकांची होणारी हि प्रचंड गैरसोय टाळण्यासाठी या वसाहतीतील अंतर्गत नवीन रस्ते करणे अत्यंत गरजेचे आहे.
हातमाग कामगारांना १२ जानेवारी पर्यंत उत्सव भत्ता व २०० युनिट मोफत वीज दिले पाहिजे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागात अहोरात्र झटणाऱ्या आशांना धमकावणाऱ्या मगरूर आरोग्य मंत्री यांनी राजीनामा द्यावा. दिव्यांगाच्या प्रश्नी निर्णय न लागल्यास दिवाळीनंतर मा. छगन भुजबळ यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे.
यावेळी साधारणतः 40 ते 45 हजार महिला कामगार व पुरुष मंडळी सामील झाले.
सदर धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी दाऊद शेख, नरेश दुगाणे, जावेद सगरी, हुसेन शेख, राजेश काशीद, नितीन कोळेकर, बजरंग गायकवाड, जुबेर सगरी,अस्लम शेख, नितीन गुंजे, प्रशांत चौगुले, युसुफ कालु, सिद्राम गायकवाड, धनराज गायकवाड, अमीन शेख, हरीश पवार सलमान शेख, अरबाज सगरी,फिरोज शेख,सनी शेट्टी, विल्यम ससाणे,वसीम मुल्ला,बापू साबळेअप्पाशा चांगले, रफिक काजी, हसन शेख,वसीम देशमुख,व सर्व गोदूताई परुळेकर सर्व कार्यकर्ते , शाम आडम, राजू काकी,श्रीनिवास बंडा, पांडुरंग काकी, अंबादास कुने, अशोक बल्ला,बाळकृष्ण मल्याळ,विजय हरसुरे, दीपक निकंबे,अंबादास बिंगी, प्रकाश कुऱ्हाडकर,राजू गेंट्याल,सनी कोंडा, किशोर गुंडला, संजय ओंकार, युसुफ शेख,बालाजी तुंम्मा,विजय मरेड्डी,इलियास सिद्दीकी,अकिल शेख, असिफ पठाण, सुनीता अंजिकाने,सलीम शेतसंदी, सुरेखा गडदे, प्रभाकर कलशेट्टी किशोर मेहता,बाबू कोकणे,शहाबुद्दीन शेख,बुवा माळी ,प्रजा नाट्य मंडळ कलापथक चे प्रशांत म्याकल, चंद्रकांत मंजुळकर,रघुनाथ सामल,विशाल पवार, अंबादास रच्चा, चंद्रकांत लिंबोळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ॲड अनिल वासम यांनी केले.