सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने परिवहन सेवा देण्यात येते. अत्यावश्यक सेवेतील परिवहन सेवा एक घटक असून या कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंजा वेतनात राबवून घेण्यात येत आहे. याबाबतीत कर्मचाऱ्यांनी शासनाकडे वांरवार निवेदने सादर करूनहि लक्ष न दिल्याने सत्याग्रह, उपोषण आदी मार्गाद्वारेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आर्थिक परिस्थितीला कंटाळून महामंडळातील अनेक कर्मचाऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत. दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत चालल्याने कामगारांमध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला व वारंवार पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने या परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याने काम बंद आंदोलन सुरु केले.
परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आज महाराष्ट्रातील आगारामध्ये सुरु झाले असून या आंदोलनाची झळ सर्वसामान्य जनतेस बसत आहे. या परिस्थितीत तोडगा काढण्या एवजी राज्याचा परिवहन विभाग संप चिरडून टाकण्याच्या उद्देशाने खाजगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मुभा देऊन आंदोलनकर्त्या कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. परिवहन कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु असलेल्या आंदोलनात भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने पूर्णपणे पाठींबा असून आंदोलनात यापुढे सक्रीय सहभाग घेण्यात येईल. तसेच प्रश्न निकाली न लागल्यास २५ हजार कामगार सोलापुरात सहभागी होतील. प्रसंगी महाराष्ट्र बंद करू अशा शब्दांत आंदोलकांना माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर संबोधित केले.
राज्यभर सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला मंगळवार दि. ९ नोव्हेंबर रोजी सोलापूर एस.टी.महामंडळ आगार येथे जाऊन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने राज्य उपाध्यक्ष माजी आमदार कॉ.नरसय्या आडम (मास्तर), राज्य सचिव कॉ.सलीम मुल्ला यांनी संपास सक्रीय पाठींबा जाहीर केले. तसेच भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी ही या संपाला पाठिंबा जाहीर केले.
ते बोलताना पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांकडून शासनांकडे केलेल्या सर्व मागण्या रास्त व न्याय असून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व भत्ते देऊन परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे. आंदोलन काळात कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये अथवा केलेली कारवाई त्वरित मागे घ्यावे. याबाबतीत लवकरात लवकर तोडगा काढून परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशा आशयाचे निवेदन ईमेलद्वारा मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री अनिल परब यांना दिले असून ही लढाई आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा या प्रसंगी दिले.
या प्रसंगी विजय यादव, महेश मुळे, प्रशांत येवले, बलभीम पारखे, आकाश जाधव, नारायण आयाचित, आकाश हिबारे, नाना मोरे, अनंत गुरव, शिवाजी काशीद, अमित गुरव, अमित जाधव, सौ.गवळी, सुनिता पाडवे, शैला खुर्द, अनिता नवगिरे, भाग्यश्री वरकुटे आदीसह कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.