येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाडण्यात आम्हाला रस नाही. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांचाच वजनामुळे पडेल,असं मत पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केलं. खासदार गिरीश बापट यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत आपल्या कुटुंबीयांसह मतदान हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी अनेक विषयांवर भाष्यदेखील केलं.
“राज्यातील महाआघाडी सरकार करोनाची महासाथ हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून महापूर, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वार्यावर सोडले. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष पाहण्यास मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत असून आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. हे त्यांच्याच वजनाने पडेल,” असं बापट म्हणाले.
“पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने सर्व सामान्य नागरिकाचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. या गोष्टीचा फायदा भाजपा मित्र पक्षाला होणार असून आमचे उमेदवार निवडून येतील. या निवडणुकीच्या निकालामधून महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्व आणि राज्य सरकार बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल,” अशा शब्दात महाविकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला.