प्रभाकर जामगुंडे यांच्या मनपातील भांडवली निधीचा खर्च
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी सोलापूर महापालिकेकडून दोन लाख रुपयांचे साहित्य भेट देण्यात आले आहे. माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांच्या भांडवली निधीतून हे साहित्य देण्यात आले आहे.
मंगळवारी, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या दालनात प्रभाकर जामगुंडे व मनपाचे अधिकारी येऊन दोन लाखांचे विविध साहित्य हस्तांतरण केले. यावेळी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, डॉ. प्रभाकर कोळेकर, सहायक संगणक प्रोग्रामर मतीन सय्यद, जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार उपस्थित होते.
डेल लॅपटॉप, कलर प्रिंटर, स्कॅनर, निकोन डीएस्एल्आर कॅमेरा, ट्रायपॉड, हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, बॅटरी, बॅग आदी साहित्य देण्यात आले आहे. विद्यार्थी व संशोधकांना महात्मा बसवेश्वरांच्या अभ्यासासाठी हे साहित्य भेट म्हणून देण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यानिमित्त महापालिकेचे व माजी नगरसेवक जामगुंडे यांचे आभार मानले आहे व संशोधनासाठी निश्चितच या साहित्याची मोठी मदत होणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक जामगुंडे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विविध भाषेतील दुर्मिळ वचन, साहित्य आणि ग्रंथाचा अभ्यास व संशोधन विद्यार्थी व संशोधकांना करता यावे, त्याचे भाषांतर व्हावे, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. सोलापूरकरांच्यावतीने बसवेश्वरांच्या अध्यासनासाठी जे काही मदत करता येईल ते आपण करू असे त्यांनी सांगितले.