येस न्युज नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणी प्रश्न आता आणखी पेटणार असल्याची चिन्हं आहेत. उजनीचे पाणी लाकडी लिम्बोडी योजनेसाठी नेण्याच्या हालचाली पवार कुटुंबाकडून सुरु असून खोटी कागदपत्रे तयार करून हे पाणी काटेवाडीला नेले जाणार असल्याचा गंभीर आरोप उजनी संघर्ष समितीचे संजय पाटील घाटणेकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. घाटणेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत.
उजनी संघर्ष समितीच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. संजय पाटील घाटणेकर यांनी कागदपत्रांसह गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले की, उजनीचे पाणी काटेवाडीला नेण्यासाठी काटेवाडी दुष्काळी असल्याचा बारामती तहसीलदार यांचा दाखल जोडल्याचे सांगितले आहे. काटेवाडीला गेल्या ७५ वर्षांपासून बारमाही पाणी मिळत असताना अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून खोटी कागदपत्रे जोडल्याचा गंभीर आरोप देखील घाटणेकर यांनी केला आहे . ही योजना जुनी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न होत असला तरी या योजनेवर 31 जानेवारी 2022 ची तारीख असल्याचे घाटणेकर यांनी दाखवून दिले.