येस न्युज मराठी नेटवर्क । केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. “पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून मुक्तता होईल,” असं नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे. “पुढील दोन वर्षात महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल, यामुळे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नाही,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
नितीन गडकरी अॅसोचॅम कॉन्फरन्समध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी मंत्रालय सध्या जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने टोल वसूल करण्याच्या प्रस्तावावर काम करत असल्याची माहिती दिली. सर्व नवी वाहनं जीपीएस सिस्टमशी जोडले जातील असंही यावेळी त्यांनी सांगितलं. जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने बस तसंच ट्रक चालकांकडून टोल वसूल केला जाणार आहे. जीपीएस यंत्रणा या वाहनांनी किती अंतर पार केलं आहे याचं मोजमाप करन आपोआप टोलची रक्कम वसूल केली जाईल. सध्या फास्टटॅग या नव्या प्रणालीमुळे टोलनाक्यांवरील वाहनांचा वेग कमी होण्याचं किंवा थांबवण्याचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे.