मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी दि. ०५.०८.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या १३ कर्मचार्यांना संरक्षा पुरस्कार देऊन सन्मानित केले. या पुरस्कारांतर्गत मुंबई विभागातून १, नागपूर विभागातून ४, सोलापूर आणि पुणे विभागांतून प्रत्येकी ३, तर भुसावळ विभागातून २ कर्मचार्यांचा समावेश आहे.
कर्तव्यादरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल, अनुचित घटना टाळण्यात आणि मागील महिन्यांत रेल्वे वाहतुकीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रत्येक पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्र आणि रु २०००/- रोख बक्षीस यांचा समावेश आहे.
पुरस्कार विजेत्यांचे तपशील:
मुंबई विभाग
1महावीर मीणा, ट्रॅक मेंटेनर, लोणावळा, मुंबई विभाग — २४.०६.२०२५ रोजी पेट्रोलिंग ड्युटीवर (निरीक्षण करत) असताना त्यांना रुळावर झाड कोसळलेले असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी तत्काळ धोका दर्शवणारा सिग्नल दाखवून ट्रॅकवर येणारी ट्रेन थांबवली आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली, त्यामुळे संभाव्य अपघात टळला.
नागपूर विभाग
2.चंदू गंगाधर सातपुते, ट्रेन मॅनेजर, बल्लारशाह, नागपूर विभाग — १७.०६.२०२५ रोजी 12670 गंगा कावेरी एक्सप्रेसच्या बी1 कोचमध्ये प्रवास करत असताना त्यांनी एक असामान्य आवाज ऐकला. त्यांनी तत्काळ साखळी ओढून गाडी थांबवली. तपासणीअंती गाडीखाली २० फूट लांबीची पाइप अडकलेली आढळली. त्यांनी ती बाहेर काढून ट्रेनमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य अपघात टळला.
3.प्रदीप कुमार, स्टेशन मॅनेजर, घुड़नखापा, नागपूर विभाग — ०४.०६.२०२५ रोजी एक मालगाडी समोरून जात असताना सिग्नलची देवाण-घेवाण करताना त्यांनी ब्रेक व्हॅनच्या टोकापासून ४२व्या वॅगनमधून ठिणग्या उडताना पाहिल्या. त्यांनी तत्काळ संबंधितांना याची माहिती दिली. पुढील स्टेशनवर ट्रेनची तपासणी करण्यात आली असता, संबंधित वॅगनची फ्लोअरिंग शीट तुटलेली असून ती चाकांमुळे ट्रॅकवर ओढली जात असल्याचे आढळले. वॅगनला दुरुस्तीयोग्य म्हणून नोंदवण्यात आले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
४.लिकेश कन्हैयालाल, तंत्रज्ञ (सी अँड डब्ल्यू), आमला, नागपूर विभाग — दि. १०.७.२०२५ रोजी मालगाडीच्या रोलिंग-इन तपासणी दरम्यान त्यांनी एका वॅगनचा ग्रीस सील आपल्या जागेवरून सरकलेला असल्याचे आणि ॲक्सल बॉक्सचा बेअरिंग कप तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आणले. वॅगन बिघाडलेली असल्याचे नमूद करण्यात आले. त्यांच्या बारकाईने केलेल्या निरीक्षणामुळे संभाव्य अपघात टळला.
५.सत्यप्रकाश राजूरकर, हेड कॉन्स्टेबल, बैतूल, नागपुर विभाग — १६.०७.२०२५ रोजी बैतूल स्थानकावर, ट्रेन क्रमांक 12804 हजरत हजरत निजामुद्दीन – विशाखापट्टनम एक्सप्रेस मध्ये एक प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करताना खाली पडताना त्यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ धाव घेत प्रवाशाला स्वतःचा जीव धोक्यात घालून सुरक्षितपणे वाचवले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि तत्परतेमुळे एक जीव वाचला.
पुणे विभाग
- मधुसूदन बाळा, स्टेशन मॅनेजर, खडकी, पुणे विभाग — ०९.०७.२०२५ रोजी ड्युटीवर असताना त्यांनी पाहिले की समोरून जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या लोको पायलटने ३० किमी/प्रतितास वेग मर्यादेच्या सूचनांचे पालन केलेले नाही. त्यांनी तत्काळ गाडीवरील कार्यरत कर्मचाऱ्याला व संबंधितांना याची माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
- सूरज लांजेवार, वातानुकूलित मेंटेनर, पुणे विभाग — दि. ०४.०७.२०२५ रोजी ट्रेन क्र. 12130 हावडा–पुणे एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असताना त्यांनी कोच क्रमांक बी6, बर्थ क्रमांक ६२ येथे वातानुकूलित डक्टमधून धूर निघताना पाहिले. त्यांनी तात्काळ साखळी ओढून गाडी थांबवली आणि अग्निशामक सिलिंडरने धूर नियंत्रणात आणला. तपासणीत सिगारेटमुळे धूर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.
- महेश तलवार, ट्रॅक मेंटेनर, पुणे, पुणे विभाग — ०७.०७.२०२५ रोजी ड्युटीवर असताना त्यांनी पाहिले की समोरून जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनपासून ७व्या वॅगनवरील स्टील रोल्स धरून ठेवणारी पट्टी तुटलेली होती. त्यांनी तत्काळ संबंधितांना याची माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
सोलापूर विभाग
- लिंगराज कांदे, स्टेशन मॅनेजर, दुधनी, सोलापूर विभाग — २८.०६.२०२५ रोजी समोरून जाणाऱ्या मालगाडीशी सिग्नलची देवाणघेवाण करत असताना त्यांनी इंजिनपासून १४व्या वॅगनची हँडल रॉड खाली लटकलेली असल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ संबंधितांना याची माहिती दिली. पुढील स्थानकावर ही समस्या दूर करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला.
- ललित कुमार, पॉइंट्समन(पथ नियंत्रक), सावली नगर, सोलापूर विभाग — १०.०६.२०२५ रोजी ट्रेन क्र. 11302 उदयन एक्स्प्रेस सोबत सिग्नलची देवाणघेवाण करत असताना त्यांनी कोच क्रमांक बी2 च्या ॲक्सल बॉक्स कव्हरचे २ बोल्ट निघाले असून बॉक्स उघडलेला असल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ संबंधितांना याची माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
- शुभम भोयार, तंत्रज्ञ (सी अँड डब्ल्यू), वाडी, सोलापूर विभाग — ०९.०६.२०२५ रोजी यार्डमध्ये मालगाडीची तपासणी करत असताना त्यांनी एका वॅगनचा मध्य बफर कपलर योक फ्रंट फॉलोअर प्लेट तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आणले. वॅगनला दुरुस्तीयोग्य म्हणून नोंदवण्यात आले. त्यांच्या बारकाईने केलेल्या निरीक्षणामुळे संभाव्य अपघात टळला.



भुसावळ विभाग
- प्रदीप बारडे, लोको पायलट, भुसावळ, भुसावळ विभाग — ११.०६.२०२५ रोजी ट्रेन क्रमांक 11025 पुणे–अमरावती एक्सप्रेस चालवताना ड्युटीवर असताना त्यांनी वादळामुळे एक झाड रुळांवर कोसळलेले असल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवली व काही प्रवाशांच्या मदतीने ते झाड बाजूला केले. सर्व सुरक्षा उपायांचे पालन करून गाडी पुढे रवाना करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला.
- मंगेश रामटेके, ट्रॅक मेंटेनर, बडनेरा, भुसावळ विभाग — ०२.०७. २०२५ रोजी ड्युटीवर असताना त्यांनी कि.मी. ६६२/११-१२ येथे रेल्वे रुळांमध्ये तडे पडलेले असल्याचे लक्षात घेतले. त्यांनी तत्काळ ट्रॅक सुरक्षित केला व संबंधितांना माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आणि त्यांच्या कर्तव्यांप्रती असलेल्या सतर्कतेबद्दल आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक करताना, महाव्यवस्थापक म्हणाले की अशा सतर्कता आणि समर्पणाच्या कृतींमुळे इतरांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास आणि जीवितहानी, मालवाहतूक आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान टाळण्यास प्रेरित केले जाईल. या प्रसंगी मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी चंद्र किशोर प्रसाद, इतर प्रधान विभाग प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.