उत्तर प्रदेशच्या राजकारणात बाहुबली म्हणून ओळख असलेल्या अतिक अहमद याचा मुलगा असद आणि शार्पशुटर गुलाम यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी झालेल्या चकमकीत ठार मारले. गेल्या काही दिवसांपासून उमेश पाल हत्याप्रकरणात या दोघांचा तपास सुरु होता. असद आणि गुलाम यांना पकडण्यासाठी ५ लाखांचे इनामही जाहीर करण्यात आले होते. उत्तर प्रदेश पोलिसांकडून या दोघांचा कसून शोध सुरु होता. अखेर गुरुवारी सकाळी हे दोघेजण झाशीत असल्याचे पोलिसांनी कळाले. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. यावेळी झालेल्या चकमकीत असद आणि गुलाम यांचा मृत्यू झाला. या दोघांकडूनही परदेशी बनावटीची पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांकडून सध्या असदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर असदचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवला जाईल.
दरम्यान, भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करण्यात आले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आणि सामान्य लोकांना सुरक्षित वाटावे, यादृष्टीने ही कारवाई आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले.तर उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनीही या कारवाईनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. पोलिसांनी खूप चांगले काम केले आहे. आता न्याय झाला आहे, पोलिसांचे आभार, अशी प्रतिक्रिया जया पाल यांनी व्यक्त केली.