नवी दिल्ली : दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सागर राणाच्या झालेल्या हत्ये प्रकरणी मुख्य आरोपी, ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारला अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी राजधानीच्या सीमावर्ती भागातून सुशील कुमारला बेड्या ठोकल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याची जिल्हा कोर्टात हजेरी होणार आहे. सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमार जवळपास 18 दिवसांपासून फरार होता.
दिल्लीच्या सीमेजवळ सुशीलसोबत त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. सुशीलविरोधात लूक आऊट नोटीस आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर एक लाखांच्या पारितोषिकाची घोषणा केली होती. अटकेपासून वाचण्यासाठी सुशील कुमारने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला होता. त्यानंतर दिल्लीच्या मॉडेल टाऊन एसीपींच्या नेतृत्वात दोन पोलीस निरीक्षक आणि डझनभर पोलीस कर्मचारी त्याच्या शोधात पंजाबला गेले होते. अखेर मोबाईल ट्रेस करुन सुशील आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीच्या सीमेवरुन ताब्यात घेण्यात आलं.