सोलापूर – शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सोलापूर येथील ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ६३ लाख ३६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, हनमंत बळीराम कोकरे वय ६१ वर्षे, रा. धम्मश्री मागासवर्गीय सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार आरोपी शांतिलाल शहा याने रिलायन्स इंडस्ट्रीज सोलापूर इन्व्हेस्टमेंट स्कीमच्या नावाखाली व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे भासवले.
आरोपीने विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला काही प्रमाणात नफा देत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दि. ०७/१०/२०२४ रोजी फिर्यादी यांच्या बँक खात्यातून १०,००० रुपये तसेच दि. १४/१०/२०२४ रोजी २०,००० रुपये अशा विविध टप्प्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा करून घेतली. यामध्ये आरोपी व त्याच्या सहकाऱ्यांनी संगनमताने शेअर मार्केटमधून नफा मिळत असल्याचा आभास निर्माण करत फिर्यादीकडून मोठी रक्कम उकळली.
अखेर फिर्यादी यांची एकूण ६३,३६,००० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. पैसे परत न मिळाल्याने तसेच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी), ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस गजा (मो. नं. ९०९५८०१००) हे करीत असून, आरोपीचा शोध घेण्याचे काम सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

