सोलापूर: अकलूज ग्रामपंचायत निडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पॅनलने वर्चवस्व कायम राखलं आहे. मोहिते-पाटील यांच्या पॅनलने 16 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटील गटाच्या संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव झाला आहे.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील विकास पॅनेलने अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच जोर धरला होता. त्याला अकलूजच्या मतदारांनी कौल दिला आहे. या निवडणुकीत अकलूज ग्रामपंचायतीवर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पॅनलचे 16 पैकी 13 उमेदवार विजयी झाले आहेत. या पॅनलचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. लोकांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांनी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारांनी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांना नाकारल्याचं दिसून येत आहे. डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील पॅनलचे गिरीराज माने-पाटील यांनी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव केला आहे. तर ज्योती कुंभार यांनी उमा शेटे यांनी पराभव केला आहे. संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी यापूर्वीच अकलूज ग्रामपंचायतीचं सरपंचपद भूषविलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.