- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील होटगी येथील तलावाच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विभागा कडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आह. याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी पर्यटन विभागाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले आहे. त्यामुळे आता लवकरच होटगी तलाव हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहॆ.
- होटगी हे सोलापूर शहराच्या हद्दीस लागून आहे. जलसंपदा विभागाच्या मालकीचा तलाव असून तलावाच्या परिसरात ६० ते ७० वर्षापूर्वी बांधलेली ब्रिटीशकालीन विश्रामगृहाची सुंदर इमारत आहे. परिसराच्या आसपास राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र, अनेक नामवंत सिमेंट उत्पादक कंपन्या आहेत. औद्योगिक विकासही वाढत आहे. हे ठिकाण उत्तम दळणवळणाच्या सुविधांनी जोडलेले आहे. तलावाचा विस्तीर्ण जलाशय आहे. शहरातील नागरीकांना व परिसरातील पर्यटकांना विश्रामगृहाची सुधारणा करून विश्रांती स्थळ, मोकळ्या जागेत बगीचा, बैठक व्यवस्था, वॉकिंग ट्रॅक, पॅगोडा, तलावात नौकाविहार, दिवाबत्ती, साहसी खेळ पार्क उभारणी , सोलर पॅनल उभारणी होऊ शकते अशी संकल्पना आमदार सुभाष देशमुख यांची होती. यासाठी त्यांनी पर्यटन विभागाकडे होटगी तलावाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केली होती त्यासाठी वारंवार पाठपुरावाही केला होता अखेर त्याला यश आले असून पर्यटन विभागाने हा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता होटगी तलाव हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार असून येथे विविध सुविधाही उपलब्ध होणार आहेत.