सोलापूर : सोलापूर शहराची हद्दवाढ होऊन ३२ वर्षे पूर्ण झाली, तरी रस्त्यांसह मूलभूत समस्या अजून सुटल्या नाहीत. लोकवस्ती वाढून वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे जुळे सोलापूर, बॉम्बे पार्क रोड परिसर, सैफुल व विजापूर रोड या मुख्य मार्गांना जोडणारे पाच डीपी रस्ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोलापुरात दौरा असून यात डीपी रस्त्यांचा विषय मार्गी लागेल, अशी जुळे सोलापूर भागातील नागरिकांची अपेक्षा आहे. या भागातील पाच रस्त्यांवरुन दररोज साधारण ४० ते ५० नगरांमधील ३० ते ४० हजार नागरिकांची वाहतुकीची समस्या दूर होणार आहे.
हद्दवाढ भागामध्ये वारंवार मागणी करूनही रस्त्याची कामे झाली नाहीत. आजही अनेक भागांत चिखलमय रस्ते आहेत. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. याबाबत माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सैफुल भागातील महत्त्वाच्या पाच डीपी रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी मागणीचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देऊन चार महिने झाले. पण लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे निधीचा विषय रखडला.
शहर हद्दवाढ भागात सुमारे ५० हून अधिक प्रकारचे डीपी रस्ते मंजूर आहेत. त्यातील काही मुख्य रस्ते वगळता अनेक डीपी रस्त्यांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यात प्रामुख्याने जुळे सोलापूर, सैफुल, बॉम्बे पार्क परिसराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे.
या रस्त्यांसाठी निधीची मागणी
१) रेणुकानगर येथील भीमाशंकर अपार्टमेंट ते उद्धवनगर भाग-एक प्लॉट नंबर १८ गदगी घरापर्यंतचा रस्ता.
२) आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुकानगरजवळील भीमाशंकर
अपार्टमेंटपर्यंतचा रस्ता.
३) द्वारका नगर येथील मंगल लोंढे यांच्या घरापासून ते मिता राठोड यांच्या घरापर्यंत डांबरी करणचा रस्ता
४) रेणुकानगर भीमाशंकर अपार्टमेंट, कृष्णा बाग, साक्षीनगर, उद्धवनगर, रेणुकानगर, बंडेनगर, दत्ततारा पार्क, प्रल्हादनगर, प्रियांकानगर, रजनीश रेसिडेन्सी पार्क, आदित्य रेसिडेन्सी, विश्वनगर, शिवभारत पार्क, चंडक मळा ते विजापूर रोड हायवे टच डीपी मंजूर रस्त्याचे डांबरीकरण.
५) आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुकानगर प्लॉट नंबर ७१२ ते कटगिरी सर प्लॉट नंबर ६७१ सर्वे नंबर ९९/१/व येथील मंजूर डीपी रस्त्याचे डांबरीकरण.
६) रेणुकानगर प्लॉट नंबर ५२० ते रेणुकानगर प्लॉट नंबर १६ पर्यंत मंजूर डीपी रस्त्याचे डांबरीकरण.
हद्दवाढ भागातील जुळे सोलापूर परिसरातील पाच डीपी
रस्त्यांसाठी निधी मंजूर करून मिळावा याबाबत प्रस्ताव दिला आहे. रस्त्यांमुळे जुळे सोलापुरातील वाहतुकीची समस्या सुटणार आहे. चार जूननंतर पालकमंत्री सोलापुरात आल्यानंतर पाठपुरावा करणार आहे.