सोलापूर दि.३:- पंतप्रधान आवास योजना अंतर्गत परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर कुंभारी येथे सोलापूर शहरातील ३० हजार असंघटीत कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रे नगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित १२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत अत्यावश्यक आहे. याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे आज २ जानेवारी २०२४ रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे.
या करारामुळे रे नगर वसाहतीला दररोज २४ एमएलडी पाणी एनटीपीसी कडून मोफत मिळणार आहे. या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून १६ एमएलडी पाणी एनटीपीसी ला विना मोबदला परत पुरवठा करावयाचे आहे. राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथून रे नगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी ५ जानेवारी २०२४ रोजी रे नगर येथील पंपहाउस येथे होणार असून यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार यांनी दिली.
बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय औष्णिक वीजनिमिती प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक मा. सौ. अनुराधा यांना सदर बिगर सिंचन पाणी वापर कराराचे प्रत सुपूर्द करून राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथून रे नगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी ५ जानेवारी २०२४ रोजी रे नगर येथील पंपहाउस येथे होणार असून या चाचणीस उपस्थित राहण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण रे नगर फेडरेशनच्यावतीने देण्यात आले. यावेळी रे नगर फेडरेशनचे मुख्यप्रवर्तक, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर), चेअरमन कॉ. नलिनीताई कलबुर्गी व सेक्रेटरी कॉ. युसुफ शेख (मेजर), म्हाडा चे मुख्य अभियंता मिलिंद अटकळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उप अभियंता संजीव धनशेट्टी मा. मेहुल मुळे, ॲड.अनिल वासम आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथे रे नगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पंपहाउस उभारण्यात आले असून त्याचे काम पूर्णत्वास आलेले आहे. या पंपहाउस मध्ये पाच पंप, जलाशयाचा साठा तसेच शास्त्रोक्त पद्धतीचे वापरण्यात आलेली उपकरणे, आधुनिक व अद्यावत साधनांचा वापर करून पंप हाऊस चे बांधकाम करण्यात आले.
यावेळी अधिक माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता चे युनूस चौधरी यांनी माहिती दिली.