मुंबई – गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या फेरबदलाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षसोबतच काँग्रेसचे ६ कार्यकारी अध्यक्षपदाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी गुरुवारीच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आज ही घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावर शिवाजी मोघे, बसवराज पाटील, मोहम्मह आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोहम्मद नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यावर प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपावून काँग्रेसने मुंबई काँग्रेसमधील नाराजी दूर केली आहे. त्याचसोबत काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांचीही घोषणा दिल्लीतून करण्यात आली आहे.
नाना पटोले यांच्या रुपाने काँग्रेसला आक्रमक प्रदेशाध्यक्ष मिळाला असून विदर्भाला प्रदेशाध्यक्ष मिळावं ही मागणीही पूर्ण झाली आहे. परंतु आता विधानसभा अध्यक्षपदी कोणाची नेमणूक होणार हे पाहणंही गरजेचे आहे, कारण काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद घेऊन विधानसभा अध्यक्षपदावरील दावा सोडण्यास तयार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.