तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामध्ये एका भारतीय व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. तुर्कीमध्ये गेलेला व्यावसायिक विजय कुमार गौड याचा भूकंपामध्ये मृत्यू झाला आहे. उत्तराखंडचा रहिवासी असलेला विजय भूकंपावेळी तुर्कीमध्ये होता. भूकंप झाल्यानंतर विजयसोबत संपर्क होऊ शकला नव्हता. त्यामुळे भारतामध्ये त्याची पत्नी आणि सहा वर्षांचा लहान मुलगा चिंतेत होता. विजयचे कुटुंबीय एखादा चमत्कार घडावा, यासाठी प्रार्थना करत होते. मात्र शेवटी विजयच्या निधनाची दु:खद बातमी समोर आली आहे. भूकंपांमध्ये सुमारे 29 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
भारतीय व्यावसायिकाचा तुर्कीमध्ये दुर्दैवी अंत
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 29 हजारांच्या पुढे पोहोचली आहे. या भूकंपात 6 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या भारतीय व्यावसायिकाचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला आहे. तुर्कीमधील भारतीय दूतावासाने एका निवेदनात म्हटलं आहे की, ‘आम्हाला कळवताना अतिशय दुःख होत आहे की, तुर्कीमध्ये 6 फेब्रुवारीच्या भूकंपानंतर बेपत्ता झालेल्या विजय कुमार या भारतीय नागरिकाचा मृतदेह मालत्या येथील हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली सापडला आहे.’
पार्थिव लवकरात लवकरच भारतात आणणार
विजय कुमार गौडचं वय 36 वर्ष होतं. विजय ज्या हॉटेलमध्ये राहत होते, ते हॉटेल 6 फेब्रुवारीला भूकंपामुळे कोसळलं. त्यानंतर विजय बेपत्ता होते. अखेर हॉटेलच्या ढिगाऱ्यातून विजयचा मृतदेह सापडला आहे. तुर्कीतील भारतीय दुतावासाने ही माहिती दिली आहे. विजय कुमार एका व्यावसायिक कामावर तुर्कीमध्ये गेले होते. भारतीय दूतावासाने मृत विजय यांच्या कुटुंबाप्रती शोक आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत. पार्थिव लवकरात लवकर आणण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.
हातावरील टॅटूवरून पटली ओळख
भूकंपानंतर विजय बेपत्ता असल्याचे सांगण्यात आलं होतं. पथकं त्याचा शोध घेत होते. आता भूकंपानंतर पाच दिवसांनी त्याचा मृतदेह हॉटेलच्या ढिगाऱ्यात आढळून आला. त्यानंतर त्याच्या मृत्यूची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, बचाव पथकाला यासाठी खूप संघर्ष करावा लागला. ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे विजयचा चेहरा विद्रुप झाला होता, त्यामुळे त्याची ओळख पटवणं कठीण झालं होतं. यानंतर त्याच्या हातावर बनवलेल्या ओम शब्दाच्या टॅटूवरून त्याची ओळख पटली.
6 फेब्रुवारीला सकाळी केला होता फोन
विजयचा मोठा भाऊ अरुण कुमार गौरने सांगितलं की, विजय ऑक्सी प्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करायचा आणि बिझनेस टूरवर गेला होता. 6 फेब्रुवारीला सकाळी विजयसोबत फोनवर बोलणं झालं होतं. इतके दिवस विजयचा फोन वाजत होता, पण कोणीच उत्तर देत नव्हतं. अरुणनं पुढे सांगितलं की, विजय 20 फेब्रुवारीला भारतात परतणार होता.
10 भारतीय तुर्कीत अडकले
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून आधी सांगण्यात आलं की, ‘भूकंपानंतर एक भारतीय बेपत्ता आहे आणि इतर 10 जण अडकले आहेत. नऊ भारतीय दुर्गम भागात सुरक्षित आहेत.’ यातील एक बेपत्ता भारतीय विजयचा आता मृतदेह सापडला आहे. दरम्यान, तुर्कीमध्ये राहणार्या भारतीयांची संख्या सुमारे 3,000 आहे, त्यापैकी सुमारे 1,800 इस्तंबूल आणि आसपास राहतात, तर 250 अंकारा येथे राहतात आणि इतर देशभरात पसरलेले आहेत.