मुबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मीरा भाईंदर मध्ये काढण्यात आलेल्या मराठी स्वाभिमान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने या परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अखेर पोलिसांच्या विरोधाला झुगारुन मनसेने हा मोर्चा काढला. मनसे नेते अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, उद्धव ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर, माजी खासदार राजन विचारे हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. अखेर अविनाश जाधव यांनी अमराठी व्यापाऱ्यांना इशारा देत हा मोर्चा थांबवत असल्याचे जाहीर केले.
आपण सर्व आजचे आंदोलन इथे थांबवत असल्याची घोषणा अविनाश जाधव यांनी केली. पोलिसांनी दबाव टाकल्यानंतर देखील सर्व मराठी माणसे मोठ्या संख्येने येथे आले आहेत. या आंदोलनातून आपला मराठी माणसाचा मेसेज पूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. ज्या ठिकाणी मराठी माणसावर दबाव टाकण्यात येईल, तिथेच मराठी माणूस रस्त्यावर येईल. याच्यापुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल, त्यांनी यापुढे आम्ही एकत्र होणार, हे लक्षात ठेवावे, असा इशारा जाधव यांनी दिला.