सोलापूर : मनोहर सपाटे आणि लता जाधव यांच्याविरुद्ध ९३/९४ या कालावधीमध्ये महापौर पदाचा गैरवापर करून संगनमताने खोटी कागदपत्रे तयार करून अभिषेक नगर मुरारजी पेठ येथील जागा ताब्यात घेऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची जमीन हडप केल्याची तक्रार सदर बाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
योगेश नागनाथ पवार यांनी ही तक्रार केली असून या गैरकारभारावर लता सुदाम जाधव यांनी मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक कविता मुसळे अधिक तपास करीत आहेत.
सरकी पेंड खरेदीत फसवणूक…
सांगली येथील विद्यासागर खराटे आणि महेश खराटे यांनी 100 क्विंटल सरकी पेंड खरेदी करून त्यापोटी 1 लाख 35 हजार रुपये बँकेत जमा केले मात्र उर्वरित रक्कम न देता एक लाख 45 हजार रुपयांचा चेक दिला परंतु तो परत आल्यामुळे श्रीशैल सिद्रामप्पा माकडे यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . या प्रकरणी पोलीस नाईक राठोड अधिक तपास करीत आहेत.
मोटार सायकल अंगावर घातल्याने दमदाटी…
विजापूर नाका झोपडपट्टी नंबर 2 येथील आम्रपाली चौकात मोटरसायकल अंगावर का घालतो अशी विचारणा करून दमदाटी केली व मारहाण केल्याची फिर्याद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अप्पू जेरबंडे आणि शंकर झेरबंडे या दोघांनी ही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस नाईक कुंभार अधिक तपास करीत आहेत.